भिर्र… भिर्र…भिरकीट : सुप्रीम कोर्टाने दिली बैलगाडी शर्यतीला परवानगी
दिल्ली | शेतकरी, बैलगाडा मालक व बैलगाडी शौकीनांचे लक्ष लागून राहिलेल्या बैलगाडा शर्यतीचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निकालात बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने बैलगाडा मालक व बैलगाडी शौकिनानी जल्लोष केला. त्यामुळे आता महाराष्ट्रात सर्जा -राजा बैलजोडी पुन्हा एकदा मैदानात भिर्र… भिर्र… करणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने आज तामिळनाडूतील पारंपरिक खेळ जल्लीकट्टू आणि महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला. ‘सर्वोच्च न्यायालयाने जल्लीकट्टू आणि बैलगाडी शर्यतींना परवानगी देणाऱ्या राज्यांच्या कायद्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.
न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने सर्व याचिकाकर्ते, प्रतिवादी, केंद्र सरकार, तामिळनाडू आणि महाराष्ट्र सरकार आणि इतरांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गेल्या वर्षी 8 डिसेंबर रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायमूर्ती जोसेफ यांच्यासह न्या. अजय रस्तोगी, अनिरुद्ध बोस, हृषीकेश रॉय आणि सी टी रविकुमार यांचा समावेश असलेल्या घटनापीठाने यावर आज अंतिम निकाल दिला आहे.