क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराज्यसातारासामाजिक

कोरेगाव तालुक्यात रेशन दुकानांत काळाबाजार : मनसेकडून तपासणीचा कार्यक्रम जाहीर करण्याची मागणी

वैभव बोडके । सातारा प्रतिनिधी 
देशाचे पंतप्रधानांनी देशभरातील गोरगरीब जनतेला दोन वेळ अन्न मिळावे, यासाठी रेशनवर मिळणारे धान्य मोफत केले असून, पुरेशे धान्य सामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले आहे. कोरेगाव तालुक्यात मात्र सध्या उलटी परिस्थिती असून, काही ठराविक रेशन दुकानदार हे पुरवठा विभागाच्या छत्रछायेखाली मोठ्या प्रमाणावर काळाबाजार करत असून, सर्वसामान्यांच्या तोंडचा घास हिरावून घेत जात असल्याचे दुर्देवी चित्र पहावयास मिळत असल्याची तक्रार मनसेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, विशेष म्हणजे आपल्या निदर्शनास आम्ही आणून देतो की, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शेवटचे टोक असलेल्या जायगाव येथील रेशन दुकानामध्ये गैरव्यवहार व अनियमितता झाल्याने दुकान निलंबीत करण्यात आले आहे. सदरील दुकान हे ग्रामपंचायत कण्हेरखेड- काटेवाडी यांचे नावे असलेल्या दुकानाकडे वर्ग करण्यात आले आहे. सदरील दुकान हे खाजगी व्यक्ती चालवत असून, त्यांच्याकडे मागणीपेक्षा जास्त धान्यसाठा उतरविला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी हे चित्र पाहिले आहे, त्यानंतर सदरील धान्य कोठे गायब होते, याचा आजवर ठावठिकाणा लागलेला नाही. कोरेगाव शहरात कोरेगाव आणि रहिमतपूर या दोन ठिकाणचे गोदाम असून, तेथील यंत्रणेच्या कृपाछत्राखाली सर्व प्रकार घडत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गोदाम किपर हे सर्व जाणून असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी होणे आवश्यक आहे.

कण्हेरखेड-काटेवाडी सारखा प्रकार कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात देखील घडत आहेत, विशेषत: फलटण-कोरेगाव राखीव विधानसभा मतदारसंघात समाविष्ठ असलेल्या वाघोलीसह अन्य दुकानांबाबत स्थानिक कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत. जळगाव, भाकरवाडी, मध्वापूरवाडी, दहीगाव आदी गावांमधील दुकानांमधून पुरेश्या प्रमाणात धान्य दिले जात नाही, ग्राहकांचा अंगठा घेतला जातो. मात्र मशीनमध्ये मोबाईलची रेंज नाही. पावती आता निघत नाही. पेपरचा रोल संपला आहे. पावती नंतर देतो, असे सांगून दुकानदार ज्या प्रमाणात माल देणे गरजेचे आहे, ते देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

कोरेगाव तालुक्यातील रेशन दुकानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र निरीक्षण यंत्रणा आहे. त्यासाठी निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. मात्र, हे अधिकारी सर्वसामान्य जनतेला अपेक्षित काम करत नाहीत. कायम स्वस्त धान्य दुकानदारांचा त्यांच्याभोवती गराडा असतो. त्यामुळे दुकानदारांची कायदेशीर मार्गाने तपासणी करत नाहीत, त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करत नाहीत, अशी तक्रार आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी या नात्याने आपण कोरेगाव तालुक्यातील रेशन दुकानांच्या तपासणीचा स्वतंत्र कार्यक्रम जाहीर करावा. त्याला प्रसिध्दी माध्यमांमधून प्रसिध्दी द्यावी. जेणेकरुन तपासणी दिवशी ग्राहक आपल्या तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचवू शकणार आहेत.

अन्यथा प्रजासत्ताक दिनी तीव्र आंदोलन
कोरेगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या छत्रछायेखाली रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत असून, त्याबाबत तालुक्याच्या सर्वच विभागातील कार्यकर्त्यांनी आमच्याकडे तक्रारी केल्या असून, स्टिंग ऑपरेशन राबविण्याची मागणी केली आहे. तरी आपण जातीने या विषयात लक्ष घालून तात्काळ कारवाई करावी आणि दोषी असलेल्या शासकीय यंत्रणेतील घटकांना शासन करावे. गैरव्यवहार व अनियमितता करणार्‍या रेशन दुकानदारांवर निलंबनाची कारवाई करावी. आपल्याकडून कारवाई न झाल्यास स्वातंत्र्यदिनी दि. 26 जानेवारी 2024 रोजी तीव्र आंदोलन छेडले जाणार असून, त्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker