चाफळला रामनवमी यात्रेस प्रारंभ, 30 मार्चला जन्मकाळ

पाटण | तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथे 376 व्या श्रीराम नवमी उत्सवानिमित्त श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे तर श्रीराम यात्रा कमिटीच्या वतीने बहारदार मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे भाविक ग्रामस्थांना यात्रेनिमित्त भरगच्च कार्यक्रमाच्या पर्वणीचा आनंद लुटायला मिळणार आहे. समर्थ रामदास स्वामींनी चाफळ येथील राममंदिरात सन 1648 पासून सुरू केलेला श्रीराम नवमी उत्सव प्रतिवर्षाप्रमाणे गुढीपाडवा पासून सुरू झाली आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदे पासून एकादशी पर्यन्त हा उत्सव सुरू असतो.
श्रीराम नवमीचा मुख्य दिवस 30 मार्च रोजी असून दुपारी 12.20 वाजता जन्मकाळ, सुंठवडा वाटप व महाप्रसाद, 31 मार्च रोजी सकाळी भिक्षावळ (समर्थ सांप्रदायाची नगरप्रदक्षिणा), 1 एप्रिल रोजी एकदशीला सूर्योदयाबरोबर रथोत्सव, सकाळी 8.30 वाजता के. बी. क्षीरसागर यांचे लळिताचे कीर्तन व समर्थ वंशज दुर्गाप्रसाद स्वामी यांचे हस्ते सेवेकरी यांना मानपान देऊन उत्सवाची सांगता होणार आहे. उत्सव काळात दररोज दुपारी 3 ते 5.30 भजन, गायनसेवा तर रात्री 9 ते 11 नारदीय कीर्तन होणार आहे. दि. 22 रोजी श्रीराम भजनी मंडळ चाफळ, दि. 23 रोजी श्री विष्णु कृपा भजनी मंडळ सातारा, दि. 24 रोजी श्री दाते भजनी मंडळ सातारा, दि. 25 रोजी श्री जानुबाई भजनी मंडळ खराडवाडी, दि. 26 रोजी श्री कृष्ण भजनी मंडळ मेढा, दि. 27 रोजी श्री माऊली स्वरतरंग भक्तिगीते मंडळ वडणगे, दि. 28 रोजी श्रीनाड ब्रम्ह संगीत भजनी मंडळ कोळेवाडी, दि. 29 रोजी श्री दत्त भजनी मंडळ काशिळ यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर मुख्य कीर्तनकार के. बी. क्षीरसागर सातारा, वंदना कापरे पुणे, श्रद्धा पाठक पुणे, बाळासो इनामदार म्हासुर्णे, लक्ष्मीबाई पोतदार बेळगाव, अश्विनी सरनौबत बेळगाव, संतोष तेलंग सज्जनगड यांचे नारदीय कीर्तन होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, श्रीराम यात्रा कमिटीच्या वतीने बहारदार मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. 30 रोजी रात्री 9 वाजता राधिका पाटील पुणेकर फेम ‘शांताबाईचा जलवा’ हा ठसकेबाज लावण्यांचा कार्यक्रम, दि. 31 रोजी रात्री 9 वाजता जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती राजेश पवार यांच्या तर्फे फटाक्यांची जोरदार आतिषबाजी, दि. 1 एप्रिल रोजी दुपारी कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष शशिकांत माने यांनी दिली.