मुख्यमंत्र्यांची तुफान डाॅयलाॅगबाजी : चुकीला माफी नाही… विरोधकांचा इन्काऊंटर
पाटण मतदार संघात 280 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन

कराड (विशाल वामनराव पाटील) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दाैऱ्यावर होते. पाटण मतदार संघातील 280 कोटींच्या विविध विकासकामांचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन, उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर दाैलतनगर- मरळी येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डाॅयलाॅबाजी पहायला मिळाली. लाडक्या बहिण योजनेवरून आमची देना बॅंक आहे, लेना बॅंक नाही. तसेच एक बार कमिटमेंट की तो में खुद की भी नहीं सूनता असा हिंदीत डाॅयलाॅग मारला. तर शेवटी बदलापूर प्रकरणावरून चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधकांना चांगलेच डिवचले. विधानसभा निवडणुकीपूर्वी शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्याच्या उपस्थिती जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
दाैलतनगर (ता. पाटण) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आयुष मंत्रालय व आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, कृषी सहसंचालक उमेश पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या जन्मभूमीत मी कार्यक्रमाला येतो, तेव्हा मला वेगळाच आनंद असतो. स्व. बाळासाहेब देसाई सांगायचे लोकांना- माणसांना जपा, तेच काम शंभूराज देसाईंनी केलं आहे. आता ऐवढे कार्यकर्ते कार्यक्रमाला आले असताना समोरच्याचं डिपाॅझिट राहणार नाही. आ. शंभूराज देसाई हुशार आहेत. त्यांनी आचासंहिते आधी विकास कामांची उद्घाटने घेवून योग्य वेळ साधली आहे. त्यांना माैके पे चाैका कसा मारायचा हे माहिती आहे. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई माझ्या खांद्याला खांदा लावून सोबत उभा होता. तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला अन् महाराष्ट्रात 6 महिन्यात नंबर वनवर आले. मधल्या अडीच वर्षात राज्य 3 ते 4 नंबरवर होते.
देना बॅंक आहे, लेना बॅंक नाही
आज छ. शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण झाले. आता मी आपल्याला हेही सांगतो येत्या शिवजयंतीला सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभा करू. आमचं सरकारच शेतकऱ्याचं असून वीजबिल माफ केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आपण सुरू केली त्यावर विरोधक टीका करू लागले, ही फसवी योजना आहे असं म्हणत होते. परंतु ही देना बॅंक आहे, लेना बॅंक नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
एक बार कमिटमेंट की तो में खुद की भी नहीं सूनता
लाडक्या बहिण योजनेवरून विरोधक सांगत होते पैसे काढून घ्या. सरकार परत पैसे घेईल परंतु, आम्ही घेणारे नाही. उलट काहीजण या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. त्या सावत्र भावना योग्य वेळी जोडा दाखवा. आमच्या लाडक्या भावानं देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण शाळा सुरू केली. प्रशिक्षण भत्ता द्यायला सुरुवात केली. एक बार कमिटमेंट की तो में खुद की भी नहीं सूनता, मुख्यमंत्री यांनी भाषाणात मारला हिंदी मधून डायलॉग मारत विरोधकांना चांगलचं डिवचलं. माझ्या बहिणीसाठी योग्य योजना सुरू केली. दीड हजारात बहिणींना विकत घेता का अशी टीका केली. त्यांना लाच देता का असे वाटेल ते विरोधक बोलत होते. ही योजना कधीच बंद होणार नाही. तुम्ही सरकारची ताकद वाढली तर दीड हजारचे दोन, अडीच- तीन हजार होतील. त्याहीपेक्षा जास्त रक्कम वाढवतच जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी 10 कोटी
धनगर समाजाला 10 कोटी रूपये स्मारकासाठी दिले. आहिल्याबाई होळकर याचं योगदान मोठ असून त्यांना 100 कोटी दिले तरी कमी पडतील. त्यांची उंची पैशात मोजता येत नाही. शंभूराज देसाई यांच्याकडे उत्पादन शुल्क पैसे येणार खातं आहे, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हस्या पिकला.
चुकीला माफी नाही… विरोधकांचा इन्काऊंटर करेल
लाडक्या बहिण योजना देताना मुख्यमंत्री सुरक्षिण बहिण देण्याचा निर्णय आम्ही घेतला. राज्यात माझ्या आई- बहिणींना वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न कुणी केला तर त्याला माफ केलं जाणार नाही. त्याला क्षमा नाही, चुकीला माफी नाही, असा पलटवार बदलापूर घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला. बदलापूर घटनेवर बाबत विरोधक बोलत होते. फाशी द्या, लवकर आणा असे म्हणत होते. पण त्या घटनेत पोलिसांवर गोळीबार झाला, तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. तर गळा काढून अोरडायला लागले, अशी दुटप्पी भूमिका विरोधकांची आहे. तो नराधम सुटला असता तर तुम्हीच म्हटला असता पोलिसांनी बंदुका काय शो-पीसला ठेवल्या आहेत का हेही तुम्ही म्हणाला असता. अशा दुटप्पी लोकांपासून आपण सावध रहा. दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांना मतपेटीतून ही जनता विरोधकांचा इन्काउंटर करेल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.
शंभूराज देसाई सगळे रेकाॅर्ड मोडणार
शंभूराज तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. तुमची लोकप्रियता, तुमच्या कामाची पोचपावती आजच्या उपस्थितीने जनतेने उपस्थितीने दिली आहे. मी नोव्हेबरच्या अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा देतो. आतापर्यंत जेवढे रेकाॅर्ड शंभूराज देसाईंनी केलं. ते सगळे रेकाॅर्ड आपण मोडणार. सगळे रेकाॅर्ड तुटणार आणि समोरच्याचं डिपाॅझिट जप्त होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
कोठे- कोठे विकासकामांचे भूमिपूजन- उद्घाटन
काळोली (ता. पाटण) लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशिय कृषी संकुलाचे उद्घाटन, पाटण नगरपंचायतीचे नगरोत्थान योजनेखाली मंजूर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन, नाडे- नवारस्ता (ता. पाटण) छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारुढ पुतळा अनावरण, मल्हारपेठ (ता. पाटण), लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामसचिवालय नूतनीकरण व नामकरण तसेच पाटण मतदार संघातील विविध विकास कामांचे ऑनलाईन भूमीपूजन लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडला.