पालकमंत्र्याच्या मरळी गावात लढत : उपसरपंचपदी राजेंद्र सणस विजयी
पाटण | पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मरळी गावच्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक दोन गटांत झाली. माजी सरपंच प्रवीण पाटील गटाकडून राजेंद्र विजय सणस तर जे. ए. पाटील गटाकडून निलेश पवार या दोघांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये 6/ 4 फरकाने प्रवीण पाटील गटाचा विजय झाला. पालकमंत्री देसाई यांच्याच गटात लढत झालेल्या निवडणुकीत राजेंद्र सणस यांनी उपसरपंचपदी बाजी मारली.
उपसरपंच निवडीनंतर उत्पादन शुल्क मंंत्री तथा पालकमंत्री आ. शंभूराज देसाई यांनी उपसरपंच राजेंद्र सणस यांचे अभिनंदन केले. यावेळी संग्राम पाटील, धनाजी पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. यावेळी मंत्री देसाई म्हणाले, स्थानिक पातळीवर सरपंच, उपसरपंच दोघेही आपल्या विचाराचे आहेत. पुढील वाटचाल करताना निवडणूकीतील विजय- पराभव आता बाजूला ठेवून केवळ मरळी गावचा विकास हेच लक्ष समोर ठेवून काम करावे. मरळी गाव एक रोल माॅडेल बनावे, यासाठी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे.
यावेळी निवडणूक अधिकारी पंकज हलकंदर, ग्रामसेवक पिसाळ, माजी सरपंच प्रवीण पाटील, मरळी सोसायटीचे चेअरमन संजय कदम, संग्राम पाटील, संजय सणस, सुनील पाटील, भरत साळुंखे, संतोष पाटसुते, श्रीपती सुतार, श्रीपती मंगे, आनंद कांबळे, सखाराम कदम, दत्तात्रय कदम, अशोक गिरी, सतीश कदम, अशोक कदम, प्रमोद कदम, निवास देसाई, सुनिल साळुंखे, किरण सुतार व नवनिर्वाचित सदस्य आनंदराव देसाई, किशोर गणवे, सौ. रूपाली कदम, सौ. संगीता कांबळे, सौ. रेखा लोकरे आदी उपस्थित होते.