मोदी सरकार लिहल्याने साताऱ्यातून संकल्प रथाची हकालपट्टी
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुघी आणि खंडाळ्यातील पिसाळवाडी येथे सरकारची संकल्प यात्रा आली असता, गावातील नागरिकांनी मोदी सरकार नावावर आक्षेप घेतला. पहिल्यांदा मोदी सरकार खोडा अन् मगच गावात योजनाची माहिती सांगायला यावे, अशी भूमिका गावातील काही लोकांनी घेतल्याने अधिकाऱ्यांसोबत काहीकाळ बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिअो चांगलाच व्हायरल होत आहे.
सातारा जिल्ह्यात मोदी सरकारकडून राबविण्यात आलेल्या योजनांची व केलेल्या कामांची माहिती गावोगावी पोहचवण्यासाठी जवळपास 15 संकल्प रथ तयार करण्यात आले असून ते जिल्ह्यातील विविध भागात फिरत आहेत. संकल्प यात्रेचा रथ कोरेगाव तालुक्यातील दुघी गावात जाताच ग्रामस्थांनी रथावरील मोदी सरकार या शब्दावर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोदी सरकार खोडा आणि मगच गावात या म्हणत मोदी सरकारच्या संकल्प रथाची दुघी गावातील ग्रामस्थांनी हकालपट्टी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ काढण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जात आहे. केंद्र सरकारच्या विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत. सरकारच्या योजना कोणा एका व्यक्तीच्या नाहीत, त्यामुळे ग्रामस्थांनी संकल्प यात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव स्वयंसेवकांना झाकायला लावले. दुघी गावात घडलेल्या या प्रकाराची चर्चा संपूर्ण जिह्यात होवू लागली आहे. अशीच घटना खंडाळा तालुक्यातील पिसाळवाडी येथेही घडली. “रथावर हे असं का लिहलंय, हे आम्ही विचारू शकत नाही का”, असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला. पैसा जनतेचा आणि जाहीरात मोदी, भाजपाची का करत आहात. लोकांनी संकल्प यात्रेचा रथच गावातून बाहेर काढला.