तांबवे फाट्यावर भीषण अपघात : एकाचा मृत्यू, तिघे जखमी

कराड :- तालुक्यातील कराड- पाटण रोडवर तांबवे फाटा येथे बुधवारी रात्री झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एकजण ठार झाला. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे वाहतूक काही खोळंबली होती. साजूरहून कराडला वाढदिवसाला जाताना हा अपघात झाला. आठवड्यात या परिसरात दुसरा अपघात झाला असून दोन जणांचा बळी गेला आहे. अपघातात राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय- 60, रा. साजूर, ता. कराड) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड- पाटण रोडवर शिवसमर्थ पंतसंस्थेच्या समोर बुलेट गाडी क्रमांक ( एमएच- 50- जे- 7080) आणि दुसरी दुचाकी क्रमांक (एमएच- 11- एए- 7313) यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत बुलेट गाडीवरील राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला. तर अन्य अोंकार अकुंश पाटील, रणजित जगन्नाथ पाटील (रा. साजूर, ता. कराड) आणि अजित जगदीश सांळुखे (रा. काले, ता. कराड) हे तिघे जखमी झाले आहेत. जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
साकुर्डीकरांची अपघातग्रस्तांना मदत
तांबवे फाटा (साकुर्डी) येथे अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींची माहिती घेत त्यांना धीर दिला. तसेच कोणताही गोंधळ न घालता, वाहनांना वाट करून दिली. तसेच साजूर गावातील लोकांना अपघाताची माहिती देत अवघ्या 10 मिनिटात मदत केली. साकुर्डीचे उपसरपंच विश्वासराव कणसे, पोलिस पाटील जयदीप देवकर, सुनिल पाटील, संदीप साळुंखे, किसन थोरात, सुरेश शिंदे, अतिश कणसे यांच्यासह व्यापारी आणि साकुर्डी गावातील तरूणांनी मदत केली.
एकाच दिवसात दोन अपघात
तांबवे फाटा आणि साकुर्डी गाव हद्दीत 500 मीटर अंतरात काल बुधवारी एका दिवसात दोन अपघात झाले. यामध्ये साकुर्डी येथे एसटी चालक दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी गेला असता त्यांची धडक उभ्या असलेल्या अॅपे रिक्षाला बसली. यामध्ये एसटी चालकांच्या प्रसंगावधानामुळे दुचाकी बचावला, मात्र अॅपे रिक्षाचे नुकसान झाले.
साकुर्डीच्या माजी सरपंचाचा अपघातात मृत्यू
साकुर्डी गावच्या हद्दीत गेल्या आठवड्यात गावचे माजी सरपंच, यशवंत पाणी पुरवठ्याचे संचालक लक्ष्मण आनंदा निकम यांचा अपघात झाला. या अपघातात माजी सरपंचाचा मृत्यू झाला.
झेब्रा क्राॅंसिंग मागणी, पालकमंत्री लक्ष देणार का?
तांबवे फाटा (साकुर्डी) येथे भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे परिसरातील हजारो लोक दररोज येत असतात. याठिकाणी चार रस्ते एकत्रित येत असल्याने वाहनांचा अंदाज लवकर येत नाही. त्यामुळे वारंवार अपघात होत असतात. या कारणामुळे साकुर्डी ग्रामपंचायत, व्यापारी यांनी या मार्गावर झेब्रा क्राॅंसिंग करावे, अशी मागणी वारंवार केली आहे. परंतु, त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, संबधित अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळेच येथे सतत अपघातत होत आहेत. तेव्हा झेब्रा क्राॅंसिंग व्हावे, तसेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्याच्या मतदार संघातील या छोट्याशा पण लोकांचा जीव घेणाऱ्या प्रश्नाकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.