मी खेड्यातला माणूस, कुस्तीची तयारी : शंभूराज देसाईंनी दिला इशारा
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पाटण बाजार समितीत तब्बल 45 वर्षांनी सत्तांतर करित सत्ता मिळवल्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी 2024 ची तयारी सुरू केली आहे. बाजार समितीच्या अभूतपूर्व यशानंतर पाटण शहरात देसाई गटाने वाजत- गाजत, गुलालाची उधळण करित विजयी मिरवणूक काढली. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटणकर यांच्या वाड्यासमोर शड्डू ठोकला. या शड्डू ठोकण्याचे कारण काय, हे खुद्द शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.
पाटण विधानसभा मतदार संघात देसाई आणि पाटणकर गट प्रत्येक निवडणूकीला आमनेसामने असतात. सातारा जिल्हा बॅकेच्या निवडणुकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी चंग बांधत तालुक्यातील विकास सेवा सोसायटी असो की ग्रामपंचायतीची निवडणूक तेथे स्वतः तसेच त्याचे चिरंजीव यशराज देसाई यांनी लक्ष घालून 30 हून अधिक ठिकाणी ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. पाटण बाजार समितीमधील सत्तांतर हा केवळ योगायोग नव्हे तर मायक्रो प्लॅनिंगचा एक भाग होता. परंतु सहकारी सेवा सोसायटी आपल्याच असल्याने तसेच एवढ्या वर्षात एकही संचालक देसाई गटाचा नसल्याने पाटणकर या निवडणुकीत गाफिल राहिल्याचे दिसून आले. त्यामुळेच एवढ्या वर्षानंतर बाजार समितीवर देसाई गटाची सत्ता आल्याने मंत्री शंभूराज देसाई यांचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांनी आगामी 2024 च्या विधानसभेची तयारी सुरू करण्यासाठीच शड्डू ठोकला, तोही पाटणकरांच्या वाड्यासमोर.
मंत्री शंभूराज देसाई यांना या त्याच्या शड्डू बाबत विचारले असता. ते म्हणाले, कायमच पाटणला देसाई- पाटणकर लढत ही ठरलेली आहे, नविन नाही. मी विक्रमसिंह पाटणकर यांच्या बरोबर लढलो, त्यांचा एकवेळा. तर सत्यजित पाटणकरांचा दोनवेळा पराभव केला. कारखान्याला पराभव केला. मला कार्यकर्त्यांनी खालून खुणावलं. कुस्ती करायची 2024 ला तयारी आहे का? मग मी खेड्यातला माणूस आहे. मी दाखवला इशारा, कुस्ती करायची आहे तयारी. त्यामुळे आम्ही 2024 ची तयारी सुरू केली आहे.