कराड बाजार समितीत वैयक्तिक स्वार्थापोटी विरोधकांची अभद्र युती : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड | मी 1997 साली सहकारी संस्थेच्या निवडणुकीत सहभाग घेतला होता. त्यानंतर मी सहकारी संस्थांच्या निवडणुकात सहभाग घेतला नाही. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही मी सहभाग घेतला नाही. आज जी अभद्र युती झाली, ज्याच्याकडे भरपूर संस्था आहेत. त्यांनी आणखी संस्था आपल्याला मिळाव्यात. त्यामध्ये संस्थेचे हित, शेतकऱ्याचे हित याला प्राधान्य न देता. केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी ही अभद्र युती झालेली मला दिसते. तेव्हा चांगल्या चाललेल्या संस्थेचे वाटोळे होवू नये. यासाठी रयत पॅनेलच्या हातात संस्था पुन्हा द्या, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
कराड शेती बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकीच्या मसूर (ता. कराड) येथे कराड उत्तर मतदार संघातील मतदार, कार्यकर्त्यांचा मेळावा व प्रचार सभेत ते बोलत होते. अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, वसंतराव जगदाळे, अजित पाटील- चिखलीकर, मनोजदादा घोरपडे, निवासराव थोरात, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, संपतराव इंगवले, बाबुराव धोपटे, नंदकुमार जगदाळे, एम. जी. थोरात यांच्यासह मतदार व उमेदवार उपस्थित होते.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, आमच्यावर पक्षाकडून दबाव आला. परंतु तो दबाव आम्ही स्विकारला नाही. आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनीही उदयदादांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घ्या सांगितले. रयत पॅनेलने सर्व उमेदवार हे सर्वसामान्य कुटुंबातील दिले आहेत. कराड उत्तरमधील एका बलाढ्य शक्तीविरूध्द लढायचं आहे. तेव्हा येणाऱ्या सर्व निवडणुका एकत्रित येवून लढायचं आहे. जे निकृष्ट आहे, ज्यांना स्वताःचा सह्याद्री साखर कारखाना चालविता येत नाही. अशा लोकांना स्वताः च्या घरातील लोकच पाहिजेत. कराड नगरपालिकेत, कारखाना असो की गजानन सोसायटी असुदे येथेही घरातीलच लोक पाहिजेत.
मनोजदादा घोरपडे म्हणाले, आज कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला तरी त्याला वाटतयं की बाजार समिती ही रयत पॅनेलच्या ताब्यात राहिली पाहिजे.
धैर्यशील कदम म्हणाले, कराड उत्तरमधील लोक येथील लोकप्रतिनिधींच्या विरोधात प्रचंड असंतोष असते.
बाजार समिती विलासकाकांनी सांभाळली : आ. पृथ्वीराज चव्हाण
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ही संस्था उभी केली. पुढे स्व. विलासराव पाटील- काका यांनी संस्थेचे नेतृत्व सांभाळले. काकांनी अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी देत नेते, नेतृत्व निर्माण केले. बाजार समितीचा विस्तार केला, धान्याचा, गुळाचा व्यापार करणारी संस्था हळूहळू जनावरांचा बाजार, फळभाजी मार्केट स्थापन केला. संस्थेकरिता जमिनी घेतल्या, व्यापाराकरिता गाळे बांधले. त्यामुळे या संस्थेचा कारभार हा सर्वसामान्याच्या हिताकरिता चालला होता, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.



