कराड कोर्टाचा निकाल : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्ष सश्रम कारावास

कराड | अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला वीस वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा ठोठावली. रोहन दत्तात्रय शेटे (वय- 29, रा. चंदररोड गोशाळेजवळ, इचलकरंजी, ता. हातकणंगले) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी ही कोरोना कालावधीत कराडात वास्तव्यास होती. त्यावेळी आरोपी रोहन शेटे याने मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तीच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2020 रोजी मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्यामुळे तीला नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी ती अठरा आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपीवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालिन पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. खाडे यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले.
खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अॅड. राजेंद्र सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी खटल्यात युक्तिवाद केला. तसेच शिक्षेवर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता आर. डी. परमाज यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी रोहन शेटे याला या गुन्ह्यात दोषी धरुन वीस वर्ष सश्रम कारावास आणि दीड लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.