कराड उत्तरमधील प्रत्येक जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद वाढवणार : काॅंग्रेसचा निर्धार

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
काँग्रेसची मोठी ताकद असूनही आघाडी धर्म पाळण्यातच काँग्रेस कार्यकर्त्यांचेच नुकसान झाले आहे. आता कराड उत्तरमधील जिल्हा परिषद गटात काँग्रेसची ताकद वाढण्यावर भर राहणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी कराड उत्तर ब्लॉकचा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसमवेत कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज, पाल, सैदापूर जिल्हा परिषद गटामध्ये संवाद दौ-याप्रसंगी दिली.
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संघटन वाढावे. व प्रत्यक्ष भेटीतून संवाद वाढविण्यावर भर द्यावा या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्ह्याचे प्रभारी श्रीरंगनाना चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, कराड उत्तर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात, सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड उत्तर ब्लॉकच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले काँगेस हा विचारांचा पक्ष आहे. या पक्षाने आजपर्यंतच्या निवडणूका या विचारांनी लढल्या आहेत, तीच शिकवण काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळत गेली आहे. सत्ता असो किंवा नसो. काँग्रेसचा विचार जपणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. आजही ते काँग्रेसच्या पाठीशी ठाम आहेत.
निवास थोरात म्हणाले आपले नेते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे संघटन राज्यात, जिल्ह्यात केले. काही नेत्यांनी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न न करता स्वतःच्या विकासावर अधिक भर दिल्याने जिल्ह्यात काँग्रेस मागे पडली. पण आता स्वतः पृथ्वीराज बाबा जिल्ह्यातील काँग्रेसची उभारणी करण्यासाठी सरसावले आहेत. त्यांना आमच्यासारखे एकनिष्ठ कार्यकर्ते निश्चित साथ देणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून संपूर्ण देश जोडला असल्याने सर्वसामान्य जनता काँग्रेसशी जोडली आहे. या दौऱ्यादरम्यान बूथ कमिटी, मंडल कमिटी तयार करून ज्या जबाबदाऱ्या पक्षाकडून दिल्या जातील त्या नियोजनानुसार सर्वानी काम करण्यासाठीचा संदेश या दौऱ्यातून दिला गेला.