किरपे गावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यही अपात्र

कराड | किरपे (ता. कराड) गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत अपात्र ठरवले आहे. माजी उपसरपंच उत्तम लोहार यांनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण करत घराचे बांधकाम केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली होती. किरपे गावची निवडणूक 2020 मध्ये बिनविरोध झाली.
या निवडणुकीत आमदार पृथ्वीराज चव्हाण समर्थक गटाचे चार सदस्य व भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले समर्थक गटाचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंच, उपसरपंचपद आमदार चव्हाण गटाकडे गेल्याने सरपंचपदी प्रज्ञा देवकर, उपसरपंचपदी विजय देवकर यांची वर्णी लागली. दरम्यान, सरपंच देवकर, उपसरपंच देवकर व ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र ऊर्फ दीपक कांबळे यांनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण करत घराचे बांधकाम केल्याची तक्रार माजी उपसरपंच उत्तम लोहार यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 अन्वये लोकप्रतिनिधींनी शासनाच्या जागेवर अतिक्रमण केल्यास ते बेकायदेशीर कृत्य समजले जात असून, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तिघांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून, बेकायदेशीरपणे घरे उभारल्याचे आढळल्याने या तिघांनाही दोषी ठरवत अपात्रतेची कारवाई केली. तसा आदेश जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी काढल्याची माहिती तक्रारदार लोहार यांनी दिली.