Loksabha चर्चा तर होणारच : साडू- साडू जोतिबाच्या यात्रेला, कौल कोणत्या उमेदवाराला?
विशाल वामनराव पाटील
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यात मोठी रंगत सुरू झाली आहे. या उमेदवारांचा विजयाचा गुलाल कोणाचा कराड, पाटणमधील मताधिक्य ठरवणार आहे. चार दिवसांपूर्वी जोतिबाच्या यात्रेला कराड- पाटण तालुक्यातील साडू -साडू एकत्रित यात्रेला गेल्याने राजकीय चर्चा ऊत आला असून जोतिबाच्या यात्रेचा गुलाल नक्की महायुती की महाविकास आघाडीला मिळेल हे आता 4 जूनलाच कळेल.
सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीचे उमेदवार माथाडी नेते शशिकांत शिंदे हे रिंगणात आहेत. कराड- पाटण तालुक्यातील जनतेचे मताधिक्य हेच विजयाचे सूत्र आजपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात ठरत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील – उंडाळकर हे साडू- साडू आहेत. जोतिबाच्या यात्रेच्या निमित्ताने हे दोघेही एकत्रित पाहायला मिळाले. त्यांच्या काही फोटोंवरून राजकीय तर्कवितर्क लढवले जावू लागले आहेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई हे महायुती घटक पक्षातील तर उदयसिंह पाटील- उंडाळकर हे महाविकास आघाडी घटकातील आहेत. राजकीय वातावरण तापलेले असताना दोन्ही नेत्यांचा एकत्रित प्रवास म्हणजे कार्यकर्त्यांना खुमासरदार चर्चा करण्यासाठी मिळालेली संधी आहे.
भाजपकडून उदयनराजेंना दोन लाखाच्या मताधिक्याचा दावा
साडू साडू जोतिबाच्या यात्रेनिमित्त एकत्रित गेल्याने महाविकास आघाडीचे नेते असलेले उदयसिंह पाटील – उंडाळकर यांना जोतिबाच्या पायावर शंभूराज देसाई यांनी घालून आणले असून उदयनराजे भोसले यांना दोन लाखाच्या मताधिक्याने विजय होतील, असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले जात आहे.
पाटणला हिशोब चुकता करण्याच्या चर्चा
पाटण विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री शंभूराज देसाई वेळ आणि काळ याची वाट पाहत असतात. आपल्याला विरोध आणणाराचा योग्य वेळी हिशोब केला जातो. तेव्हा यावेळीही शंभूराज देसाई हिशोब चुकता करतील, अशा चर्चा सुरू आहेत.