कराडला 17 ला मनोज जरांगे- पाटील : सातारा- सांगली जिल्ह्यातून लाखांहून अधिक मराठ्यांचे वादळ येणार
कराडच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सभेचे आयोजन
कराड | मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर येत असून शुक्रवारी (दि. 17) कराड येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी एक लाखांहून अधिक मराठा बांधव- भगिनी उपस्थित राहणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या समन्वयकांनी दिली आहे. या सभेकरिता पार्किंग व्यवस्थाही नियोजित करण्यात आली असून स्वतंत्ररित्या समित्याही स्थापन केल्या आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील राज्यभर दाैरे करत असून त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कराड तालुका मराठा सकल समाजाकडून गेल्या आठवड्यात शहरात मोर्चाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो मराठा बांधवांनी उपस्थिती लावत राज्याचे लक्ष वेधले होते. आता श्री. जरांगे- पाटील यांच्या सभेकरिता सातारा आणि सांगली जिल्ह्यातून किमान एक लाखांहून अधिक मराठा बांधव उपस्थिती लावतील असा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला. दिनांक 17 आणि 18 नोव्हेंबरला सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर मनोज जरांगे- पाटील येत आहेत. दि. 17 नोव्हेंबरला रात्री 7 वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियमवर त्यांच्या जाहीर सभेचे कराड- पाटण सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. कराड येथे जरांगे-पाटील यांच्या होणाऱ्या सभेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
सभेला कराड- पाटण तालुक्यांसह जवळच्या कडेगाव, शिराळा, सातारा, खटाव तालुक्यांतील एक लाखांहून अधिक मराठा बांधव-भगिनी येतील, असा विश्वास आहे. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आचारसंहितेनुसार ही सभा होणार आहे. सभेसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सभेला उच्चांकी गरजे व्हावी, यासाठी संबंध प्रयत्न सुरू केलेत यासाठी गावोगावी बैठक घेऊन जनजागृती करण्यात येत आहे. या सभेचे आयोजन कराड आणि पाटण तालुका मराठा समन्वयक समितीने केले आहे.
स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था अशी
■ मसूर, विटा भागांतून येणाऱ्या वाहनांसाठी- शिवाजी हौसिंग सोसायटी, राम मंदिर परिसर, विठामाता विद्यालय, शिवाजी हायस्कूल परिसर, श्री हॉस्पिटलच्या समोरील मोकळी जागा
■ वाठार, रेठरे, उंडाळे, कार्वेकडील वाहनांसाठी- कल्याणी ग्राउंडचा परिसर, कराड बाजार समितीच्या तळाचा परिसर, भेदा चौक ते बाजार समितीच्या रस्त्याकडेला
■ पाटणकडून येणाऱ्या वाहनांसाठी- दैत्यनिवारणी परिसर, शासकीय विश्रामगृहाच्या समोरील परिसर, पंकज हॉटेलकडून येणाऱ्या रस्त्याच्या परिसर