माऊलींची पालखी उद्या सातारा जिल्ह्यात : स्वागतासाठी लोणंदनगरी सज्ज

लोणंद | श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्या रविवारी (ता. 18) लोणंद येथे अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी आगमन होत आहे. सोहळ्यातील वारकरी व भाविकांना पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, वीज, सुरक्षा आदी विविध प्रकारच्या सोयी सुविधा चांगल्यारीतीने पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व प्रशासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी गेल्या 20 दिवसांपासून येथे अहोरात्र झटून जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे लोणंदनगरी माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. संपूर्ण सातारा जिल्हा माउलींच्या स्वागतासाठी आतुरला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या आषाढीवारीच्या वाटेवर लोणंद हे मुक्कामाचे महत्त्वाचे ठिकाण आहे. शेकडो वर्षांपूर्वी माउलींचा आळंदी ते पंढरपूर पायीवारी सोहळा सुरू केला, त्या हैबतबाबांच्या जन्मभूमीत माउलींच्या पालखी सोहळ्याचे लोणंद येथे आगमन होते. लोणंद नगरपंचायतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, नगर अभियंता सागर मोटे व सर्व नगरसेवक यांनी गेल्या काही दिवसांपासून येथे युद्धपातळीवर कामे करून तयारी केली आहे.
पालखी तळावर मुरमीकरण करून कच टाकून तळाचे रोड रोलरच्या साह्याने सपाटीकरण केले आहे. खेमावती नदीची स्वच्छता करण्यात आली आहे, तसेच जेसीबी, फरांडी ट्रॅक्टर व रोड रोलरच्या साह्याने शहरातील व आजूबाजूच्या रहदारीच्या रस्त्यांवर अतिक्रमणे हटवून झाडेझुडपे तोडून मुरूम टाकून डागडुजी केली आहे. आमदार मकरंद पाटील यांच्या माध्यमातून दगडवस्ती पाणीपुरवठा विहीर येथे 25 केव्ही, तर पाडेगाव पाणीपुरवठा केंद्र येथे 63 केव्ही क्षमतेचे विजेचे नवीन ट्रान्सफॉर्मर केव्ही क्षमतेचे विजेचे नवीन ट्रान्सफॉर्मर तत्काळ बसवून पाणीपुरवठा मुबलक होऊन खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. पालखी तळीवरील धोबीघाटाची दुरुस्ती करून तेथे 24 तास पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. महिलांसाठीचे पूर्वीचे निकामी झालेले स्नानगृह पाडून तेथेच उत्तरेकडे नवीन स्नानगृह बांधले आहे.
तसेच तळावर प्लड लाईटचे टॉवर उभारून आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे. दर्शनबारीत पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी नळ कनेक्शन देऊन, तसेच डोक्यावर मंडप टाकून सावलीचीही व्यवस्था केली आहे. तळावर विविध सुविधा पुरवणारी कार्यालये व नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत. शहरात १४ ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचे नियोजन केले आहे. संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून गावातील मोकळ्या जागेत दिंड्या उतरणाऱ्या ठिकाणच्या वेड्या बाभळी व झाडेझुडपे तोडून स्वच्छता केली आहे. सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या व गटारे यांचीही स्वच्छता केली आहे. जंतुनाशक पावडर व डासांच्या बंदोबस्तासाठी फॉगिंग मशिनद्वारे धूर डी फवारणी केली जात आहे. गावातील च व पाडेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील सर्व पाण्याच्या टाक्या धुवून व विद्युत मोटारींची व जलवाहिन्यांची दुरुस्ती करून नळ पाणीपुरवठ्याची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी टीसीएल व तुरटीचा पुरेसा साठा उपलब्ध केला आहे. पालखी सोहळ्यानंतर संपूर्ण शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायतीने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची तयारीही केली आहे.