बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर
सातारा | सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 6 डिसेंबर 2012 रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्याची योजना राबविण्यात येतो.
या योजने अंतर्गत सातारा जिल्हा कार्यालयाकडे सन 2018-19 ते सन 2022 -23 अखेर एकूण 51 बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने मिळणेकामी विहित नमुन्यातील अर्जाव्दारे प्रस्ताव दाखल केलेले होते. छाननी अंती 43 बचत गटांचे प्रस्ताव परिपुर्ण आढळून आलेले होते. त्यानुसार दि. 25 मार्च 2023 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सातारा येथे बचत गटांच्या प्रतिनिधींसमवेत लॉटरीव्दारे सोडत आयोजित करण्यात आलेली होती. त्यानुसार सातारा जिल्हयातील 20 बचत गटांची लॉटरीव्दारे अंतिम निवड करण्यात आलेली असून उर्वरीत 23 बचत गट प्रतिक्षासूचीवर ठेवण्यात आलेले आहेत. अंतिम निवड करण्यात आलेल्या 20 बचत गटांना मंजूर लाभाची रक्कम लवकरात लवकर संबंधीत बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
प्रतिक्षा सूचीवरील बचत गटांना शासनाकडून जस-जसे अनुदान उपलब्ध होईल, त्याप्रमाणे मंजूर लाभाची रक्कम संबंधीत बचत गटाच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली जाईल. मात्र, सन 2018-19 ते सन 2022-23 अखेर प्रतिक्षा सूचीवरील बचत गटांचा दि. 31 मार्च 2023 पर्यंतच विचार केला जाईल. प्रतिक्षा सूचीवरील बचत गटांसाठी सन 2022-23 या वर्ष अखेरीस अनुदान उपलब्ध न झाल्यास संबंधित बचत गटांनी पुढील आर्थिक वर्षामध्ये नव्याने प्रस्ताव दाखल करणे बंधनकारक राहील, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे नमूद केलेले आहे.