बाप- लेकाने मोबाईलवर स्टेटस ठेवून विहिरीत उडी मारली : मुलाचा मृत्यू

सातारा | पुसेगाव (ता. खटाव) बाप- लेकाने मोबाईलवर व्हॉटस्अॅप स्टेटस ठेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. यात 27 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून, वडीलांना वाचविण्यात यश आले. व्यवसायासाठी भाड्याने घेतलेल्या गाळा मालकाच्या त्रासाला कंटाळून बाप-लेकाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद वडिल बाळकृष्ण कोळी यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणात गाळा मालक शंकर किसन गोडसे व दत्तात्रय शंकर गोडसे (दोघेही रा. वडूज) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण कोळी यांनी दुकान टाकण्यासाठी वडूज येथील शंकर गोडसे व त्यांचा मुलगा दत्तात्रय गोडसे यांच्याकडून दोन गाळे भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यावेळी डिपॉझिट दीड लाख रुपये आणि 10 हजार प्रती महिना भाडे देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे डिपॉझिटची रक्कम देऊनही गोडसे यांनी लिव्ह अँड लायसन्स करार करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर महिनाभरातच पैशांची गरज आहे म्हणून पुन्हा एक लाख रूपये रोख रक्कम घेतली. भाड्याने घेतलेल्या गाळ्यात कोळी यांनी पाच ते सहा लाख रुपयांची भांडी विक्रीसाठी ठेवली. परंतु काही दिवसांपासून दुकान मालक गोडसे यांनी भांड्याचे दुकान भांडी विक्री करण्यासाठी कोळी यांना उघडू दिले नाही.
त्यामुळे कोळी यांनी दि. 5 मे रोजी वडूज येथील काळे हॉस्पिटलशेजारी देशमुख यांचा गाळा भांड्याचे दुकान टाकण्यासाठी दहा हजार रुपये रोख अॅडव्हान्स रक्कम देऊन भाड्याने घेतला. दि. 9 मे रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी व मुलगा अवधूत असे दोघे दत्तात्रय गोडसे व शंकर गोडसे यांच्या घरी गेले व अॅडव्हान्स दिलेले 2 लाख 50 हजार रुपये रोख रकमेची परत मागणी केली. त्यावेळी दत्तात्रय गोडसे व शंकर गोडसे या दोघांनी तुम्हाला गाळा सोडता येणार नाही. गाळा सोडला तर तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आमच्याकडे पुन्हा 50 हजार रुपयांची मागणी करून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जातिवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व पैसे द्या नाहीतर दुकान उघडून देणार नाही, अशी धमकी दिली. आम्हास त्यानंतर दुकान उघडून दिले नाही. म्हणून दत्तात्रय शंकर गोडसे च शंकर किसन गोडसे या दोघांच्या त्रासाला कंटाळून बाळकृष्ण कोळी व मुलगा अवधूत कोळी यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले, असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बाप वाचला पण मुलगा बुडालाच
दि. 2 जून रोजी रात्री साडेसात वाजता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगा अवधूत याने वडील बाळकृष्ण यांच्या समक्ष घडलेला सर्व प्रसंग स्वतःचे हस्ताक्षरात लिहिला असून, त्यावर दोघांनी सह्या केल्या व उजव्या हाताचा अंगठा दिला आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजण्यास सुमारास बाळकृष्ण व मुलगा अवधूत या दोघांनी स्वतःच्या मालकीच्या पुसेगावच्या हद्दीतील कोळकी नावाच्या शिवारातील विहिरीजवळ जाऊन लिहिलेला स्टॅम्प पेपर विहिरीचे बाजूला ठेवला. दोघांनीही पोहायला येत नसल्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळून विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे दोघांनी पाण्याने भरलेल्या विहिरीत उडी मारली. त्यावेळी बाळकृष्ण यांचा थोर भाऊ विनायक मारुती कोळी, बहीण लिलावती मारुती कोळी या दोघांनी भाऊ बाळकृष्ण यांना विहिरीतून बाहेर काढले. मात्र, मुलगा अवधूत याला वाचविण्यात अपयश आले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे पाटील करत आहेत.