गणराया महायुतीच्या पाठिशी पाठबळ राहो : मंत्री शंभूराज देसाई
यशराज देसाई मित्र परिवाराकडून कोयना नदीकाठी महाप्रसाद
कराड :- राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री आणि ठाणे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी गणरायाकडे प्रार्थना केली आहे. कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीकाठी युवा उद्योजक सचिन पवार यांनी आयोजित केलेल्या अन्नछत्रास भेट दिल्यानंतर शंभूराज देसाई म्हणाले, राज्यात गणरायाचे भक्तिभावाने जड अंतकरणाने निरोप दिला जात आहे. बाप्पाचं कृपाछत्र महाराष्ट्रावर रहावं. सर्वांना सुख, शांती, भरभराट देवून सर्वजण आनंदी राहावेत. महायुतीच्या पाठिशी गणरायचं पाठबळ राहो, अशी प्रार्थना करतो.
तांबवे- सुपने जिल्हा परिषद गटातील गणेश भक्तांसाठी कोयना नदीकाठी तांबवे येथील कोयना पुलाजवळ युवानेते यशराज देसाई दादा मित्रपरिवाराच्या वतीने युवा उद्योजक सचिन पवार आणि संभाजी पवार यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या अन्नछत्रास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, डाॅ. विजयसिंह पाटील यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 5 हजारांपेक्षा अधिक गणेशभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी सहाव्यांदा आमरण उपोषणाला आजपासून सुरूवात केली आहे. यावर सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे- पाटलांना रात्री उपोषणाला बसू नका म्हणून फोन केला होता. याबाबत मंत्री शंभूराज देसाई कराड तालुक्यातील तांबवे येथे बोलत होते ते म्हणाले, मला दोन दिवसापूर्वी समजलं मनोजदादा उपोषणाला बसणार आहेत. तेव्हा काल त्याच्याशी बोललो, त्यांना विनंती केली उपोषणाला बसू नका. कारण त्याच्या ज्या काही मागण्या आहेत, हैद्राबाद गॅजेट संदर्भात त्यावर कार्यवाही सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सतत आढावा घेत आहेत. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय लवकर घेण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. याच आठवड्यात मंत्रीमंडळ बैठकीच्या एकदिवस अगोदर किंवा नंतर उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोजदादांना दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी शासन सर्व प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे.