घरातील वयोवृद्ध माऊलीची सेवा करा :- राजू ताशिलदार
बनवडी फाटा येथील सिल्वर वुड्स गणेश मंडळात प्रबोधनात्मक मार्गदर्शन

कराड:- पंढरपूरच्या विठ्ठलाला आपण माऊली म्हणतो. वारकऱ्यांची माऊली पंढरपुरात असते. तशीच माऊली आपल्या घरात असते ती आपली आई होय. माऊली, माऊली करत आपण पंढरपूरला जातो. तसंच आपल्या घरातील माऊलीची आपल्या वयोवृध्द आई- वडिलांची सेवा करा, असे प्रबोधनात्मक मार्गदर्शन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी केले.
बनवडी फाटा येथील सिल्वर वूड्स गणेशोत्सव मंडळाच्या आयोजित आरती सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, वरिष्ठ पत्रकार व लेखक अभयकुमार देशमुख, विशाल पाटील उपस्थित होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, खजिनदार राजेंद्र शेळके, डॉ. सुभाष कांबळे, डॉ. भूषण येलुरे, गहिनीनाथ काळे, राजेंद्र माळी व राजेंद्र कदम, चंद्रकांत क्षिरसागर, बबन पलसांडे, अमृत मोहिते, दीपक चव्हाण, अक्षय आडुळकर यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
राजू ताशिलदार म्हणाले, सिल्वर वूड्स गणेशोत्सव मंडळाने ही एकी कायम ठेवावी. सिल्वर वूड्स गणेशोत्सव मंडळ हे खरेतर गोल्डन मंडळासारखेच आहे. सर्वांनी ट्रॅफिक नियमांचे पालन करावे, कारण ते तुमच्यासाठी फायद्याचेच आहेत. महिलांनी गणेशोत्सवात किंवा गर्दीच्या ठिकाणी सोन्याचे अलंकार वापरताना सावधगिरी बाळगावी व चोरट्यांपासून सतर्क राहावे. तसेच कौटुंबिक जीवन सुखकर ठेवण्यासाठी घरातील सर्वांचा एकमेकांशी सुसंवाद असणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.