अभिमानास्पद : कराडची श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड (SRL) नौदलासाठी कार्यरत

कराड:- कराडची श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड (SRL) कराडवासियांना नवीन नाही. आजवर स्थानिक तरुणांना उत्तमउत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या आहेत. कंपनीने नवनवीन व्यवसायिक कार्यक्रम हाती घेतलेले आहेत. तसेच 01 ऑगस्ट 2025 रोजी SRL बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट झाली आहे. मागील एका दशकाहून अधिक काळ SRL भारतीय नौदलासाठी कार्यरत आहे. भारतीय नौदलासाठी काम करताना SRL भारतातील अनेक शिपयार्ड साठी काम करते.
श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड (SRL) ला हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड(HSL) कडून भारतीय नौदलाच्या फ्लीट सपोर्ट शिप (FSS) प्रकल्पासाठी टर्नकी HVAC प्रणाली पुरवण्यासाठी 106.62 कोटी रुपयांचा डिफेन्स सेक्टरची ऑर्डर मिळाल्याची घोषणा कंपनीने 25 ऑगस्ट 2025 रोजी केली.
HSL नौदलासाठी पाच FSS जहाजे बांधत आहे, जी समुद्रात असलेल्या जहाजांना इंधन, अन्न आणि दारुगोळा पुरवण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. यामुळे भारताच्या नौदलाची क्षमता आणि पोहोच लक्षणीय वाढणार आहे. हा प्रकल्प सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या प्रगतीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सादर केला जात आहे.
या नवीन ऑर्डर आधी श्री रेफ्रिजरेशन लिमिटेड (SRL) ला त्याच प्रकल्पासाठी रेफ्रिजरेशन प्लांटसाठी 30.72 कोटी रुपये आणि मॅग्नेटिक बेअरिंग चिलर्ससाठी 68.61 कोटी रुपयांचे ऑर्डर मिळाली होती. या सर्व ऑर्डर एकत्रित स्वरूपात SRL पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या नौदल जहाजासाठी संपूर्ण टर्नकी वातानुकूलन आणि रेफ्रिजरेशन पॅकेज पुरवणार आहे.
HVAC & R उपाय योजना पूर्णपणे स्वदेशी पातळीवर विकसित केल्या जाणार आहेत. ज्यामुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरतेवर भर दिला जात आहे. या ऑर्डर मुळे SRL च्या एकूण ऑर्डर बुकने आता 300 कोटी रुपयांचा टप्पा देखील ओलांडला आहे. ज्यामुळे राष्ट्रीय संरक्षण प्रकल्पांमध्ये त्यांची वाढती भूमिका अधोरेखित होते. कंपनीने सांगितले की, ही कामगिरी त्यांच्या नाविन्य, आत्मनिर्भरता आणि भारताच्या सागरी क्षमतेला समर्थन देणारे उपाय पुरवण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.