अखेर रणजितसिंह देशमुखांच्या लढ्याला यश : प्रलंबित साडेपाच कोटीचे अनुदान मंजूर

सातारा | खटाव, माण तालुक्यांत 2018 मध्ये जनावरांच्या चारा छावण्या दुष्काळात उभारल्या होत्या. त्याचे अनुदान रखडल्याने शासनाकडे रणजितसिंह देशमुख यांनी आंदोलने करून पाठपुरावा केला होता. या लढ्याला अखेर यश आले असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या प्रयत्नातून अनुदान प्राप्त झाल्याने दोन्ही तालुक्यांतून समाधान व्यक्त होत आहे. रणजितसिंह देशमुख यांच्या लढ्याला यश मिलाले असून तब्बल 5 कोटी 35 लाक 28 हजार 728 रूपये प्रलंबित अनुदान मंजूर झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुक्यांत जनावरांच्या चारा छावण्या 2018 मध्ये उभारण्यात आल्या होत्या. खटाव- माण तालुक्यातील विविध सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांची जनावरे जगली पाहिजेत, या उदात्त हेतूने चारा छावण्या उभ्या केल्या. संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयांचे भाग भांडवल गुंतवले होते. दरम्यान, वेळेत अनुदान न मिळून देखील चारा छावण्या व्यवस्थितरीत्या सुरू होत्या. माण, खटाव तालुक्यांतील एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीतील अनुदान प्रलंबित होते. अनुदान लांबणीवर पडत असल्याने चारा छावणीधारकांच्यात असंतोष निर्माण झाला होता.
अशावेळी रणजितसिंह देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. मात्र, दुष्काळी भागाला आंदोलनाशिवाय काहीही मिळत नाही, याची प्रचिती यानिमित्ताने आली. चारा छावणीधारक व शेतकऱ्यांना सोबत घेऊन देशमुखांनी विविध प्रकारे आंदोलने केली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन थकीत अनुदानाबाबत लेखी पत्रही दिले होते, तर माजी मंत्री महादेव जानकर यांनी याबाबत विधान परिषदेत आवाज उठवला होता. याला विभागीय आयुक्त, पुणे यांच्या कार्यालयाकडून थकीत चारा छावणी अनुदान निधी वितरित करण्याचे आदेश सोमवारी (ता.7) जारी करण्यात आले. यामुळे खटाव, माण तालुक्यांतील चारा छावणीधारकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे..



