कराड उत्तरमधील 3 हजार 500 युवती व महिलांना विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू : कुलदीप क्षीरसागर
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विकास अभियान

मसूर प्रतिनिधी । गजानन गिरी
श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा विकास अभियानांतर्गत कराड उत्तर मधील साडेतीन हजार युवती व महिलांना विविध व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देत त्यांना स्वबळावर उभे करण्याचे काम सध्या सुरू आहे. नजीकच्या काळात स्वयंरोजगार महामेळावा घेऊन शहरातील नामांकित कंपन्यांमध्ये 2000 युवकांना गुणवत्तेनुसार नोकरी देण्याचे उद्दिष्ट असल्याची ग्वाही युवा नेते कुलदीप क्षीरसागर यांनी बोलताना दिली.
सातारा विकास अभियानांतर्गत समाजात उत्कृष्ट काम करणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक, पत्रकार, महिला पोलीस, डॉक्टर्स, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, ग्रामसेवक, तलाठी व सुमारे 25 शाळा-महाविद्यालयाचे गुणवंत खेळाडू, माजी सैनिक, प्रगतशील प्रगतशील, यशस्वी उद्योजक, सीआरपी, स्वच्छता दूत, खेळ, क्रीडा, वकृत्व, निबंध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंतांचा मसूर येथील सुयोग मंगल कार्यालयात सन्मान करण्यात आला. यावेळी दिलीप मैत्रानी, अनुप देसाई, केंजळे मॅडम, मुल्ला मॅडम, उस्मान मुल्ला, स्वा.सै.पार्वतीबाई खापे, श्रीमती शशिकला क्षीरसागर यांच्यासह सुमारे 3 हजार सत्कारमूर्ती महिला, पुरुष, युवक – युवती व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कुलदीप क्षीरसागर म्हणाले, आजच्या कार्यक्रमात अफाट गर्दी व प्रेम पाहून अंत:करणापासून भारावून गेलो. सर्वसामान्यांचे कोणतेही काम असू द्या, घेऊन या ते श्रीमंत छ. उदयनराजे महाराजांच्या माध्यमातून ताकतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. भविष्यात सुमारे सात ते आठ हजार महिलांना प्रशिक्षित करून त्यांचा सन्मान करण्याचा मनोदयही यावेळी क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
यावेळी पोलीस खात्यात नव्याने रुजू झालेल्या युवतींचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी नेमणुकीनंतर आमचा पहिला सन्मान असल्याच्या भावना पोलीस कर्मचारी युवतींनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर खेळाडू व इतर सन्मान धारकांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. कार्यक्रम प्रमुख संदीप पवार यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले.