सातारा जिल्हा ‘जाणता राजा’लाच मानणारा : शंभूराज देसाई
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराची कबुली
कराड ः- सातारा लोकसभा मतदार संघ आपण काहीही कितीही म्हणलं तरी जाणता राजाला (शरद पवार) मानणारा मतदार संघ आहे. या मतदार संघातील माणसं काही विचाराने बांधली गेलेली आहेत. तेव्हा त्यांना बाजूला करणं आणि मोदीच्या विचाराचा खासदार आपल्या मतदार संघात निवडूण देण्याची कामाची पध्दत आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची असेल तर निश्चितपणे विजय मिळेल. परंतु, त्यासाठी ट्रीपल मायक्रोप्लॅनिंग काम करण गरजचं असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा जिल्ह्यात महायुतीचा उमेदवार ठरला नसला तरी आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आज कराड उत्तर व दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा विजयनगर (ता. कराड) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, भाजपचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर, भरत पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, विक्रमबाबा पाटणकर, माजी आ. आनंदराव पाटील यांच्यासह शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, महायुतीचा उमेदवार निवडूण आणायची जबाबदारी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची असून त्याच्याच नेतृत्वात लढत आहोत. पुढील काळात सातारा जिल्ह्यात लोकसभा मतदार संघाची पुर्नरचना होईल, त्यामध्ये पुढील खासदार शंभूराज देसाईच असतील, आम्ही तुमच्या मागे असो सांगू शकत नाही. मला दिल्लीचे वातावरण मानवत नसल्याने दिल्लीला जाण्याचं टाळतो. मनात कोणीही शंका कुशंका न ठेवता सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाच्या अंगावरच गुलाल पडला पाहिजे.
आ. शिवेंद्रराजे आणि छ. उदयनराजे या दोन्ही भाऊ- भाऊ ठरवून आले आहेत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गळ्यात लोकसभेचं सगळं घालायचं. कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण या तीन मतदार संघात एकूण मतदानाच्या ५५ टक्के मतदान आहे. परंतु, या ठिकाणी महायुतीचा एकच आमदार आहे तर महाविकास आघाडीचे दोन आमदार आहेत. कराड दक्षिणमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष याचे पूर्वीचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री तर कराड उत्तरमध्ये माजी पालकमंत्री दोघेही दिग्गज आहेत. तरी आम्ही कमी पडणार नाही, मात्र, पालकमंत्री म्हणून माझं एकच सांगण आहे. मायक्रो प्लॅनिंग करण गरजेचं आहे.
मिसळीवरून राजकीय टोलेबाजी
सातारा लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत छ. उदयनराजे भोसले राष्ट्रवादीतून तर माथाडी नेते नरेंद्र पाटील शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर एकमेकांविरोधात उभे होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी आ. शिवेंद्रराजे यांची भेट घेत साताऱ्यात एका हाॅटेलमध्ये मिसळ खाल्ली होती. या मिसळीवरून आजच्या महायुतीच्या मेळाव्यात राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. छ. उदयनराजे यांनी नरेंद्र पाटील यांनी मला मिसळ खायला नेले नव्हते, मात्र मी स्टेजवरील सर्वांना मिसळ खायला नेणार असल्याचे सांगितले.