पालकमंत्री कोणीही असूदे फरक पडत नाही :- जयकुमार गोरे
तांबवे जिल्हा परिषद गटात भाजपाची प्रचार सभा

कराड :- तांबवे असेल पाटण तालुका असेल किंवा सातारा जिल्ह्यातील कोणताही जिल्हा परिषद गट असेल त्याला कोणी वाली नाही. असं कोणी म्हणत असेल तर या सर्व लोकांना विश्वास देण्यासाठी मी आलो आहे भारतीय जनता पार्टी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्यावर कोणतही प्रशासकीय प्रेशर पाडणार नाही. तेव्हा पालकमंत्री कोणीही असला तरी फरक पडणार नाही असे म्हणत ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना टोला लगावला.
सुपने तांबवे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार धनंजय उर्फ रवी ताटे, पंचायत समिती गणाचे उमेदवार तानाजी देवकर, स्नेहलता पाटील यांच्या प्रचारार्थ तांबवे (ता. कराड) येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सुनील बामणे, सरपंच विश्वासराव निकम, एडवोकेट अमित नलवडे, साहेबराव गायकवाड, निवास शिंदे, तात्यासाहेब बाबर, शंकर पाटील, माजी सरपंच आबासाहेब पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, पाटण मतदार संघात छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुका असो की किंवा कोणतीही निवडणूक असो बोलवून दम दिला जात आहे मात्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगायला आलो आहे तुम्ही कुणाला घ्यायची गरज नाही कारण तुमच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष आहे तसेच विकास कामासाठी कोणी म्हणत असेल मी पालकमंत्री आहे. तर कोणतंही काम ग्राम विकास खात्याशिवाय होत नाही तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी ग्रामविकास खात्याच्या मार्फत तुम्हाला पाहिजे तेवढा निधी देईन कोणताही कमी पडू देणार नाही असा शब्द देतो.
जिल्हाध्यक्ष अतुल भोसले म्हणाले, सुपने तांबवे जिल्हा परिषद गट काकांच्या विचाराचा होता. या ठिकाणी आता त्यांच्या वारसदारांना हा गट दुसऱ्यांना सोडावा लागला आहे. त्यामुळे काकांचा विचार सोडणाऱ्यांना या ठिकाणी त्यांची जागा दाखवून द्यावी.



