पाटणकरांनी तुतारी सोडली… कमळ हाती
हिंदुराव पाटलांचा काँग्रेसला बायबाय

सातारा :- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून निष्ठावंत म्हणून असलेले पाटणकर गटाने राष्ट्रवादी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनी रामराम ठोकला. पाटणकरांनी तुतारीला सोडत घड्याळाला हात दाखवत कमळ हाती घेतले. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात सत्यजितसिंह पाटणकर, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य हिंदुराव पाटील यांनी भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
मुंबईत पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, राजाभाऊ शेलार यांच्यासह पाटणकर गटातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपात पक्ष प्रवेश केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला वर्धापनदिनी साताऱ्यात धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी भाजपाचे खेळी असल्याचे सांगितले जात आहे. भाजपाच्या मुंबईतील नरिमन पॉईंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सुरू आहे. सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का आहे. तर शंभूराज देसाई यांच्यासाठी हे एक आव्हान असणार आहे. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.