मसूरच्या शितोळे वस्तीत वीज आणल्याचा भाजपचा फुकटचा श्रेयवाद : मसूरला राष्ट्रावादीचा आरोप
आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून वीज

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कराड तालुक्यातील मसूरच्या शितोळे वस्तीत 1993 सालातच ग्रामपंचायत स्तरावर वीज आलेली आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्यानुसार उर्वरित वीज यंत्रणेचा प्रश्न मागेच सुटला असताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करित आहे. दिवाळीत शितोळे वस्तीत वीज आणल्याचा उद्घाटनाद्वारे केवळ भाजपने कांगावा केला. वीज यंत्रणेच्या उद्घाटनाला वस्तीतील कुणीही उपस्थित नसताना बाहेरच्या लोकांना घेत केलेले उद्घाटन भाजपच्या ब्रह्माचा भोपळा फुटल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी फुकटच्या घेतलेल्या श्रेयवादाचा निषेधही करण्यात आला.
पत्रकार परिषदेला सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, सामाजिक कार्यकर्ते कादर पिरजादे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, सदस्य रमेश जाधव, माजी सरपंच प्रकाश माळी, विक्रांत शितोळे, भरत कांबळे, धीरज जगदाळे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने वीज यंत्रणाच्या कामाबाबतचे शिफारस पत्रासह मागील वीज बिलेही सादर केली. मसूरची 25 वर्षे विजेविना अंधारात चाचपडत पडलेली शितोळे वस्ती दीपावलीच्या पहिल्याच दिवशी उजेडात न्हाऊन निघाल्याचा कांगावा करीत वीज यंत्रणेचे उद्घाटन भाजपने दिमाखात केले. भाजपने फुकटचा श्रेयवाद लाटल्याचा मुद्द्यावर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. वस्तीत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मागेच वीज आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सन 1993 ला शितोळे वस्तीत वीज आलेली त्याचे पुरावे व दाखलेही आहेत. दोन वर्षापासून उर्वरित वीज यंत्रणेच्या कामाबाबतचा पाठपुरावा आमदार बाळासाहेब पाटील व माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नानुसार सुरू होता. बारा पोलचे काम ग्रामपंचायत अख्यारित बसत नसल्याने काम प्रलंबित राहिले. महावितरण अधिकाऱ्यांच्या समवेत ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती. रास्तारोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. एक महिन्यात कामाबाबत अधिकाऱ्यांनी आश्वासित केले होते. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या 19 जुलै 2023 पत्राद्वारे डीपीडीसीतून काम मार्गी लावण्याबाबत सूचना दिल्या. ग्रामपंचायतीने पाठपुरावा केल्याने काम मार्गी लागले. महावितरणच्या कार्यकारी अभियंता जाधव मॅडम, अभियंता बुंदिले, नलवडे, कुंभार या अधिकाऱ्यांचे प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. वास्तविक यंत्रणेच्या कामाचे उद्घाटन दिवाळीनंतर घेण्याचे ठरवले होते. मात्र याबाबतची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना लागल्याने त्यांनी गडबडीत दिवाळीत वीजयंत्रणेचे उद्घाटन उरकून घेत श्रेय घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपवर केला. तसेच श्रेयवाद लाटण्याचा निषेधही पत्रकार परिषदेत केला.