साताऱ्यातील वादावर शंभूराज देसाई म्हणाले : जाणीवपूर्वक विरोध खपवून घेतला जाणार नाही
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी उभारलेल्या शिवतीर्थाचं नाव कसं बदलू?

सातारा | आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. माझ्या आजोबांनी शिवतीर्थ उभारले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोवई नाक्यावर उभा केला आहे. तेव्हा तिथं शिवतीर्थ नाव बदलून कसं कोणाचं देवू. परंतु दुसरी मोकळी जागा आहे, तिथं जर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावानं आम्ही करत असू तर त्याला कोणी जाणीवपूर्वक विरोध करत असेल, तर असला विरोध खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.
साताऱ्यात पोवई नाका येथील शिवतीर्थाचं नाव बदलण्यावरून साताऱ्यातील शिवप्रेमी तसेच सातारकर नागरिक आक्रमक झाले होते. खुद्द छ. उदयनराजे भोसले यांनीही सोशल मिडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. तसेच राजमाता यांनीही शिवतीर्थावर येत या गोष्टीची माहिती घेतली होती. यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती. यावर आता शंभूराज देसाई यांनी याबबत सविस्तर आपली भूमिका मांडली आहे.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, माझी एक बैठक होती, त्या बैठकीत पोवई नाका परिसरात पूर्वी एक जुना आयलॅन्ड होता. भुयारी मार्गाच्या कामामुळे ते आयलॅन्ड काढण्यात आले. त्या मोकळ्या जागेत एक आयलॅन्ड तयार करणं, सुशोभीकरण करणं अशा प्रकारचा चाैक तयार करण्याचं प्रस्तावित आहे. पालकमंत्री म्हणून ते मला अधिकार आहेत. शिवतीर्थाचं नाव बदलून दुसरं कुठलं तरी नाव देणं हे माझ्या सारख्या तरी कार्यकर्त्याच्या मनात येणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत. राजघराण्याला ज्या पध्दतीने राजघराणे म्हणून आदर आहे, तसाच आदर छत्रपतींचे मावळे म्हणून आम्हालाही आहे. या गोष्टीचा विपर्यास करण्यात आला आहे.
शिवतीर्थाचा नाव बदलण्याचा प्रश्नच नाही : शंभूराज देसाई
आमच्या झालेल्या मिटींगच्या नोटीसमध्ये कुठेचं शिवतीर्थाचा उल्लेख नाही. माझ्या आजोबांनी शिवतीर्थ उभारले आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पोवई नाक्यावर उभा केला आहे. तेव्हा तिथं शिवतीर्थ नाव बदलून कसं कोणाचं देवू. दुसरी मोकळी जागा आहे, तिथं जर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावानं आम्ही करत असू तर त्याला कुणी त्याला विरोध करण्याचं काम नाही. जी जागा मोकळी आहे, पडून आहे, वापर नाही अशा ठिकाणी आम्ही काही करत असू अन् त्याला कोणी जाणीवपूर्वक विरोध करत असेल, तर असला विरोध खपवून घेतला जाणार नाही.