कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना बुडालेला एकलुता एका मुलाचा मृतदेह सापडला
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
खराडे (ता. कराड) येथे कृष्णा नदीत गणपती विसर्जन करताना बुडालेल्या गणेश संतोष जाधव या 21 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आज सकाळी सात वाजता शोध पथकाला सापडला. आज दुपारी एक वाजता त्याच्या मृतदेहावर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुरुवारी अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळच्या सुमारास गणेश घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीत गेला असताना नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. त्याला पोहता येत नव्हते. कराड नगरपालिकेचे शोधपथक नदीत त्याचा शोध घेत होते. शुक्रवारी रात्री आठ वाजेपर्यंत नदीच्या पाण्यात शोध पथकाची शोध मोहीम सुरू होती. रात्री अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी सहा वाजता परत मोहीम सुरू करण्यात आली. गणेश बुडालेल्या ठिकाणापासून खालील बाजूस पाचशे मीटरच्या अंतरावर त्याचा मृतदेह शोध पथकाला मिळून आला. शोधमोहीम पथकासह पोलीस प्रशासन सतर्कतेने लक्ष ठेवून होते. दुपारी एक वाजता स्मशानभूमीत त्याच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गणेश आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मित्रपरिवार मोठा आहे. त्याचे सैन्यदलाचे प्रशिक्षण सुरू होते. गणपतीसाठी तो गावी आला होता. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबावर व त्याच्या मित्र परिवारावर दुःखाची छाया पसरली. शोध मोहीम पथकासह पोलीस प्रशासन सतर्कतेने लक्ष ठेवून होते.