ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

कराड दक्षिणेत वार फिरलंय… बाबा आमदार फिक्सच

विशाल वामनराव पाटील

विधानसभा निवडणूक जाहीर होण्याअगोदर पासूनच सातारा जिल्ह्यात एकदम टाईट अन् फाईट वातावरण हे कराड दक्षिणेत निर्माण झाले आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेची वाट न पाहता भाजप आणि काॅंग्रेसकडून प्रचाराला सुरूवात केल्याने कार्यकर्ते चांगलेच तापलेले आहेत. कराड दक्षिणेत वार फिरलंय… आमचेच बाबा फिक्स आमदार असा आत्मविश्वास दोन्ही बाबांच्या कार्यकर्त्यांना आला आहे. सोशल मिडियावर नुसता धिंगाणा सुरू असून आपलाच नेता ग्रेट असा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण- बाबा आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डाॅ. अतुल भोसले- बाबा यांच्यात यंदा चांगलीच लढत पहायला मिळणार आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत प्रमुखात तिरंगी लढत पहायला मिळाली, परंतु यंदा प्रमुख दोन बाबांच्यात लढत असणार आहे. डाॅ. अतुल भोसले यांना दोनवेळा दक्षिणेत पराभव पत्कारावा लागला असला, तरी त्यांचे मताधिक्य वाढलेले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार असल्याने डाॅ. भोसले यांना देवेंद्र फडणवीसांनी मोठी ताकद दिली. डाॅ. भोसले यांनीही भाजपासाठी मोठे कष्ट घेतले असून प्रचार यंत्रणा राबविण्यापासून संपर्क, गाठीभेटीवर मोठा भर दिला आहे. त्यामुळे डाॅ. अतुल भोसलेंचे कार्यकर्ते आमचेच बाबा फिक्स आमदार असणार असल्याचे सांगत आहेत.

गेल्या दोन निवडणुकापेक्षा यंदाची निवडणूक वेगळी असल्याने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाकडून विकासकामे तसेच राज्यातील राजकीय असलेले वजन यांचा प्रचार करत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चारित्र्य आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचे सांगत कराडची अोळख म्हणून कार्यकर्ते सांगत आहेत. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आ. चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांचे आणि निधीचे बॅंनर लावून कोट्यावधीचा निधी आणल्याचा प्रचार केला आहे. तसेच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आ. पृथ्वीराज चव्हाण हेच मुख्यमंत्री होतील असा दावाही काॅंग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कराडकरांनी निवडूण द्यायचा, अशा पोस्ट सोशल मिडियावर चांगल्याच व्हायरल होत असून आ. पृथ्वीराज चव्हाण यांचेही कार्यकर्ते आमचेच बाबा फिक्स आमदार असणार असल्याचे सांगत आहेत.

विधानसभा निवडणूकीच्या मतदानाला आणि निकालाला अजून महिना बाकी असला तरी कार्यकर्ते मात्र दोन्ही बाजूंनी आक्रमक झाले आहेत. दोन्ही गट वार फिरलंय… आमचेच बाबा फिक्स आमदार म्हणू लागले आहेत. आता यांचा फैसला थेट 23 नोव्हेंबरलाच पहावा लागणार आहे.

दोन्ही गटाचा ताकद वाढविण्यावर भर

कराड दक्षिणेत अगदी छोटे- मोठे ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटी संचालक, पदाधिकारी, नगरसेवक यांना आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही गट प्रयत्न करत आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या दोन निवडणूकीत सोबत नसलेली उदयसिंह पाटील- उंडाळकर यांची रयत संघटना सोबत आली आहे. तर डाॅ. अतुल भोसले यांनीही ग्रामीण भागासह शहरी भागात लक्ष घातले असून सर्व समाजातील मतदार आपल्याकडे वळविण्यासाठी विशेष अशी यंत्रणा राबविली आहे. त्यामुळे दोन्ही गट आपली ताकद वाढविण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे.

रिल्सनी मार्केट खाल्ले

सध्या सोशल मिडियावर प्रचार करण्यासाठी रिल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. डाॅ. अतुल भोसले आणि आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीमकडून लोकांच्या प्रतिक्रिया घेवून तसेच नेत्यांची भाषणे यांची रिल्स बनवली जात आहेत. सामान्य लोकांच्याकडूनही उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया दोन्ही बाबांच्या बाबत दिल्या जात आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker