कराडच्या डीबी पोलिसांकडून चोरीला गेलेले 2 लाखांचे मोबाईल मूळ मालकांना परत : चार राज्यात शोधमोहिम
कराड | शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं चार राज्यातून गहाळ झालेल्या तब्बल दोन लाख रुपये किंमतीच्या 15 मोबाईलचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत मिळवून दिलेत. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश या चार राज्यातून सायबर सेलच्या मदतीने मोबाईलचा शोध घेतला.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड शहरातून तसेच मुख्य बाजार पेठेतून अनेक मोबाईल गहाळ झालेले आहेत. त्यापैकी काही मोबाईलचा पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शोध घेतला. सायबर पोलीस ठाणेच्या माध्यमातुन तसेच तांत्रिक विश्लेषण करुन महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्रा, उत्तर प्रदेश या राज्यातुन मोबाईलचा शोध घेवून मोबाईल धारकास त्यांचे माबाईल परत केले. कराड शहर डीबी पथकाच्या या कारवाईचे मोबाईल मालकांनी काैतुक केले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ, रईस सय्यद यांच्या पथकाने केली आहे.