मलकापूर नंतर याठिकाणी नगरपंचायतीची गरज ः पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज बाबांच्या निधीतून रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन
कराड :- सैदापूर- विद्यानगरचे नागरीकरण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मूलभूत सोयी सुविधांसाठी लोकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्या झपाट्याने पूर्ण होण्यासाठी सैदापूरला नगरपंचायतीशिवाय पर्याय नाही, असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता कराड तालुक्यात मलकापूर नंतर सैदापूर- विद्यानगरच्या विकासासाठी तालुक्यातील दुसरी नगरपंचायत होण्याकडे वाटचाल होणार आहे.
विद्यानगर (सैदापुर) येथील गुरुदत्त कॉलनीत दहा लाखांच्या आमदार निधीतून होणाऱ्या रस्ता काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रयत कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, उपाध्यक्ष नितेश जाधव, तालुका खादी ग्रामोद्योगचे शिवाजी जाधव, माजी उपसरपंच सचिन पाटील, दत्तात्रेय जाधव, राजेंद्र जाधव, तानाजी माळी, विवेक जाधव, धनाजी जाधव, सतिश जाधव, वैशाली जाधव,आदित्य काळभोर आदींसह कॉलनीतील नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले , माझ्या राजकारण व समाजकारणात सैदापूरचा मोठा वाटा आहे. माजी सरपंच आनंदराव जाधव आप्पा व विठ्ठलराव जाधव तात्या यांनी अखेरच्या श्वासापर्यंत काँग्रेसला साथ दिली. त्यांच्यासह संपूर्ण सैदापूर चव्हाण कुटुंबीय व काँग्रेसच्या पाठीशी राहिले. त्या माध्यमातून सैदापूरचा विकास करण्याचे भाग्य मला लाभले. मुख्यमंत्री असतानाही मोठ्या प्रमाणात निधी देता आल्याचे समाधान आहे. गेल्या पाच वर्षातही मागेल त्या ठिकाणी विकास कामांसाठी निधी दिला आहे. यापुढेही सैदापूर व विद्यानगरसाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल. शहरालगतचे उपनगर असल्यामुळे सैदापूरला नागरिकरण वाढत आहे त्यामुळे विकासाची भूकही मोठ्या प्रमाणात आहे. ती पूर्ण करायची असेल तर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सैदापूरला ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतीची आवश्यकता आहे. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळू शकेल. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी आमदार चव्हाण यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी कॉलनीतील संदीप नामदेव जाधव, संभाजी निकम, सुदामा कुंडले, अशोक निकम, रमेश गायकवाड, नवनाथ शिंदे, प्रताप साळुंखे, पंकज पाटील, सदाशिव पाटील, श्री. भाकरे, श्री. इंगवले, श्री. पवार, श्री. शिंदे, निजाम काझी आदी उपस्थित होते. नितेश जाधव यांनी स्वागत केले. उदय थोरात यांनी आभार मानले.