कराड सोलर ऊर्जा
कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

मसूर नंबर एक सोसायटी स्व-मालकीत गेल्याचे समाधान : मानसिंगराव जगदाळे

विकास सेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभा

मसूर(हॅलो न्यूज):- मसूर नंबर एक सोसायटीने संचालक मंडळ व सभासदांचा विश्वास, नियोजनबद्ध, काटकसरीचा आणि पारदर्शक कारभाराचा वारसा कायम ठेवल्याने संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत गेला. त्याचेच फलित म्हणून आज स्वमालकीच्या इमारतीचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचे समाधान संस्थेचे मार्गदर्शक व शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केले. मसूर (ता. कराड) येथील मसूर नंबर एक विकास सेवा सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन शहाजीराव जगदाळे होते.

मानसिंगराव जगदाळे म्हणाले, मसूरसह सहा गावांचे कार्यक्षेत्र आणि १८०० सभासद असलेल्या या संस्थेने सभासदांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले. पूर्वी ३ ते ४ लाख कर्जवाटप असलेल्या या संस्थेची उलाढाल आज १२ कोटींच्या पार गेली आहे. सभासदांचा दोन वर्षांचा डिव्हिडंड व कर्जमाध्यमातून ६२ लाख रुपये खर्चाची, ५४०० स्क्वेअर फुटांची दोन मजली सुसज्ज इमारत उभी राहिली आहे.

अध्यक्ष शहाजीराव जगदाळे यांनी, सभासदांना यावर्षी ८ टक्के डिव्हिडंड जाहीर केल्याने सभासदांची दिवाळी गोड होईल, असे सांगितले. तसेच उर्वरित थकबाकी वेळेत भरण्याचे आवाहन केले. जिल्हा बँकेचे विकास अधिकारी अविनाश पन्हाळे यांनी संस्थेला स्वमालकीची इमारत मिळणे हा मैलाचा दगड असल्याचे सांगत थकबाकी वसुलीचे महत्त्व पटवून दिले.

सचिव विजयराव जगदाळे यांनी जमा-खर्चाचा ताळेबंद व अंदाजपत्रक सादर केले. संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माजी सचिव दिनकरराव शिरतोडे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रकाश माळी यांनी आभार मानले. सभेला संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पशुखाद्य, खत व औषधी विभाग सुरू करणार

संस्थेच्या नवीन सुसज्ज वास्तूत भविष्यात सभासदांच्या सोयीसाठी पशुखाद्य, खत विक्री आणि औषधी विभाग सुरू करण्याचा मानस मानसिंगराव जगदाळे यांनी व्यक्त केला. तसेच इमारतीतील इतर गाळे व सर्व सुविधायुक्त हॉल अल्प दरात भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून मयत सभासदांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य दिले जाईल, असा निर्णय त्यांनी जाहीर केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close