ऐतिहासिक तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत

सांगली (हॅलो न्यूज) – तासगाव संस्थानच्या गणपती रथोत्सवादरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत झाली आहे. रथातून खाली उतरत असताना गर्दीत त्यांचा पाय चिरडला गेल्याची माहिती आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून दुखापतीनंतर ते तातडीने उपचारासाठी कराडला आले होते. तेथून ते पाटण तालुक्यातील मरळी दौलतनगर येथे नियोजित भेटीगाटीसाठी गेले असून आज तेथे ते मुक्कामी आहेत. तर उद्या सकाळी जनता दरबार घेणार आहेत. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पायाला दुखापत झाली असली तरी ती गंभीर नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे.

उदयसिंह पाटील – उंडाळकर भेटीला
राष्ट्रवादीचे नेते व शंभूराज देसाई यांचे स्नेही उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी कराड येथील शासकीय विश्रागृहात भेट घेत विचारपूस केली. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी दुखापत गंभीर नसल्याचे सांगितले. तसेच फॅक्चर नसल्याचेही सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांनी दाैलतनगर येथील पदाधिकारी बैठक रद्द करून साताऱ्याला मंत्री शंभूराज देसाई यांनी जावे, असे म्हटले. परंतु, मंत्री श्री. देसाई यांनी कार्यकर्त्यांना थांबवले आहे, मी मरळी- दाैलतनगरलाच जाणार असल्याचे सांगितले.

दाैलतनगरला सकाळी 10 वाजता जनता दरबार
पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या व प्रश्न जाणून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत बुधवार ,दि. 16 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता दौलतनगर, ता. पाटण येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबारामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या विविध समस्या, अडचणी व प्रलंबित प्रश्न मांडता येणार आहेत. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तरी पाटण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन जनता दरबारास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



