Shekar Patil Maqheshwari Infra 1
ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

भुताच्या गुहेचे आकर्षण : मसुरला मंडळाचा देखावा पाहण्यासाठी भागातील गणेशभक्तांची पहाटेपर्यंत गर्दी

मसूर (हॅलो न्यूज) :- गणेशोत्सवानिमित्त मसूर येथील ‘जय हनुमान गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, चावडी चौक मसूर’ यांनी साकारलेली “वाट अंधारबनाची” ही अंगावर शहारे आणणारी आकर्षक, अघोरी, पछाडलेली आणि झपाटलेली गुहा सध्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे। अंधार, रहस्य आणि भीतीने भरलेला हा थरारक अनुभवाचा प्रवास पाहण्यासाठी गणेशभक्तांची तुफान गर्दी होत आहे.
ही पछाडलेली गुहा पाहण्यासाठी केवळ मसूरच नव्हे, तर परिसरातील १० ते १२ लहान-मोठ्या गावांतील भाविक व नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत। गुहेतील थरार अनुभवण्यासाठी नागरिकांना तब्बल दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे.

अंगावर काटे आणणारा देखावा
गुहेमध्ये प्रवेश करताच प्रत्येक वळणावर दडलेला थरार आणि अचानक येणारे धक्कादायक अनुभव गणेशभक्तांना हादरवून सोडत आहेत। गुहेत भुतांचे हुबेहूब पेहराव, रात्रीच्या काळोखातून येणारे भयानक व किरकिर आवाज, विविध प्रकारची झाडे, भयप्रद वातावरण आणि स्मशानभूमी यांसह अनेक थरारक प्रसंग कौशल्याने साकारण्यात आले आहेत। महिला व लहान मुलांनाही धडकी भरविणाऱ्या या सजावटीला नागरिकांकडून अभूतपूर्व असा मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा भव्य देखावा आणि गुहा तयार करण्यासाठी मंडळाच्या ५० हून अधिक तरुण कार्यकर्त्यांनी सुमारे १० ते १५ दिवस अहोरात्र मेहनत घेतली आहे। गणेशोत्सवातील हे भव्य आकर्षण आणखी चार दिवस नागरिकांना पाहण्यासाठी खुले राहणार आहे.

नागरिकांसाठी विशेष ‘विनंती-सूचना’ फलक
देखाव्यातील अति-थरारक आणि भीतीदायक प्रसंग लक्षात घेता, मंडळाने प्रवेशद्वारावरच सुरक्षेच्या दृष्टीने एक ‘विनंती – सूचना’ फलक लावला आहे। त्यावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की: “आम्ही जो थरारक देखावा केला आहे तो पाहण्यासाठी स्वतःच्या जबाबदारीवर प्रवेश करावा… भीती वाटून कोणाला काही झाल्यास मंडळ जबाबदार राहणार नाही.हृदयाचा त्रास असणारे ज्येष्ठ नागरिक, भीती वाटणारे घटक आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाने या सूचनेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

लोकप्रतिनिधी व मान्यवरांची विशेष भेट
या अद्वितीय व थरारक देखाव्याचे कौतुक करण्यासाठी भागातील अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधींनी या गुहेला भेट दिली। यामध्ये : कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, आमदार धैर्यशील कदम, जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे, माजी अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, मसूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात.यावेळी सर्व मान्यवरांनी मंडळाच्या कल्पकतेचे व तरुण कार्यकर्त्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे विशेष कौतुक केले.

सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ
हे मंडळ केवळ उत्सवापुरते मर्यादित नसून गेल्या ४५ वर्षांपासून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवीत आहे। यामध्ये वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता अभियान, गरजूंना व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर पत्नींचा गौरव व सत्कार, तसेच मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन यांसारखे सामाजिक उपक्रम मंडळ हिरिरीने राबवते.

जय हनुमान गणेश व नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही गणेशभक्तांसाठी नवनवीन आणि कल्पक देखावे साकारण्याचा प्रयत्न करतो. यंदा साकारलेल्या ‘वाट अंधारबनाची’ या देखाव्याला नागरिक व भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून आमची १५ दिवसांची मेहनत सार्थकी लागली आहे. मंडळाची गेल्या ४५ वर्षांची सामाजिक परंपरा जपण्यासोबतच युवकांना एकत्र आणून हा थरारक अनुभव आम्ही गणेशभक्तांसमोर मांडला आहे. नागरिकांनी सुरक्षेची काळजी घेऊन सर्वांनी या देखाव्याचा आनंद घ्यावा.

— ऋषीकेश बर्गे ,कार्यकर्ता, जय हनुमान गणेश व नवरात्र उत्सव मंडळ, चावडी चौक, मसूर.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close