सातारा जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी : पोलीस हवालदाराला ट्रकसोबत दीड किलोमीटर नेलं फरफटत

सातारा (हॅलो न्यूज) :- म्हसवड मध्ये वाळू तस्करांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला रोखणाऱ्या पोलीस हवालदारालाच ट्रकच्या पायरीवरून तब्बल दीड किलोमीटर फरफटत नेऊन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हवालदार महावीर कोकरे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होता.

या प्रकरणी प्रितम लोखंडे आणि अवि तोरणे या दोघांना अटक करण्यात आली आहे. म्हसवड पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. मात्र, एवढी गंभीर घटना घडूनही गुन्हा दाखल करण्यास २८ तासांचा विलंब का झाला? यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर तहसीलदार, तलाठी आणि महसूल कर्मचाऱ्यांनाही वाळू तस्करांच्या दादागिरीला सामोरं जावं लागत असल्याच्या तक्रारी होतात. त्यामुळे आता एकच प्रश्न उपस्थित होत आहे. वाळू तस्करांची ही मुजोरी नेमकी कुणाच्या जोरावर? आणि कोणाच्या वरदहस्तामुळे होत आहे.
अनिल देसाईंची गृहमंत्र्याकडे मागणी
माण- खटाव मतदार संघात यापूर्वीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवसापूर्वी म्हसवड येथे वाळू तस्करांनी पोलीस हवालदारासोबत घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. महावीर कोकरे पोलीस असूनही दोन दिवस गुन्हा दाखल झाला नाही. तहसीलदार, प्रांताना वाळू माफिया दम देतायत. तेव्हा गृहमत्र्यांनी या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाळू माफियांना धडा शिकवावा, अशी मागणी जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केली आहे.




