गोलमाल है भाई गोलमाल : चोरी झाली मात्र तक्रार नाही, कराड पालिकेच प्रशासन कोणाला वाचवतंय

कराड (हॅलो न्यूज) :- कराडच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरातील जुन्या जॅकवेलमध्ये चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी जॅकवेलमधील ५० एचपी मोटर सेटसह स्टार्टर सेट, कॅपॅसिटर, पॅनल सेट, कनेक्शन फिटिंग तसेच केबल वायर असा मोठ्या प्रमाणात विद्युत साहित्य लंपास केले आहे. या चोरीबाबत विरोधकांनी आवाज उठवला आहे, त्याबाबतचे निवेदन दिले आहे. मात्र, प्रशासनाने 15 दिवसापूर्वीच चोरी होवूनही का दुर्लक्ष केले असा सवाल उपस्थित होत आहे.
गेल्या 15 दिवसापूर्वी चोरी होवूनही प्रशासनाने तक्रार का केली नाही?. नक्की प्रशासन कोणाला वाचवतंय का?, पालिकेच्या प्रशासनाला या चोरीचे गांभीर्य नाही का? विरोधी नगरसेवकांनी आवाज उठवला नसता तर प्रशासन प्रकरण दाबणार होते का? असे अनेक प्रश्न आता सामान्य नागरिकांच्यातून उपस्थित होवू लागले आहेत. तेव्हा गोलमाल है भाई गोलमाल अशीच परिस्थिती सद्यातरी कराड पालिकेच्या कारभारात दिसत आहे.
या चोरीच्या घटनेची माहिती मिळताच कराडमधील भाजपच्या नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जॅकवेलची पाहणी करून चोरी झालेल्या साहित्याची माहिती घेण्यात आली. चोरटे खिडकीतून जॅकवेलमध्ये प्रवेश करून आतमध्ये असलेले साहित्य चोरून घेऊन गेल्याचे तेथील कारागिराने नगरसेवकांना सांगितले.
या घटनेमुळे जलशुद्धीकरण केंद्राच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, चोरीचा तपास करून संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विजय वाटेगावकर, आशुतोष डुबल, सुमित जाधव, गणेश पवार, शिवाजी पवार, अतुल शिंदे आणि अजय पावसकर उपस्थित होते.सदरची चोरी झाल्यानंतर आतातरी प्रशासनाने सीसीटीव्ही बसवावेत, अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली आहे.



