Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

पाटणच्या संगमनगरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर डल्ला ; ३.६१ लाखांचा ऐवज लंपास

शटरचे कुलूप तोडून तिजोरी फोडली; सीसीटीव्ही कॅमेराही चोरट्यांनी नेला

पाटण (हॅलो न्यूज) : पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का येथील गिता ज्वेलर्स या सोन्या-चांदीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री डल्ला मारून ३ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी दुकानातील तिजोरी फोडून तब्बल १ किलो ८०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच सीसीटीव्ही कॅमेराही चोरून नेला. या घटनेने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, याप्रकरणी कोयनानगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वेलर्सचे मालक योगेश उत्तम पावसकर (रा. पाटण) यांनी मंगळवारी (दि. १) रात्री साडेसातच्या सुमारास दुकानातील चांदीचे दागिने तिजोरीत ठेवून दुकान बंद केले. कुलूप लावून ते पाटण येथील घरी गेले. रात्री ११.२८ वाजता त्यांनी मोबाईलवरून दुकानातील ऑनलाइन सीसीटीव्ही तपासला असता दुकान सुरक्षित असल्याचे दिसून आले. दरम्यान, बुधवारी (दि. २) सकाळी ७.४० वाजता दुकानाशेजारील गारवा कोल्ड्रिंक शॉपीचे मालक प्रकाश काटे यांनी पावसकर यांना फोन करून दुकानाचे शटर उघडे असल्याची माहिती दिली.

दुकान मालक पावसकर हे वडिलांसह सकाळी नऊच्या सुमारास दुकानात पोहोचले. त्यावेळी दुकानाच्या शटरची कुलपे गायब असून शटर सुमारे एक फूट उघडे असल्याचे आढळले. तसेच दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही गायब होता. दुकानात प्रवेश केल्यानंतर लोखंडी तिजोरी उघडी असल्याचे दिसून आले. तिजोरीतील तसेच शोकेसमधील चांदीचे दागिने गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी पैंजण, जोडवी, मासोळ्या, लहान मुलांचे करदोडे, मनगट्ठे आदी चांदीचे दागिने लंपास केले. या दागिन्यांचे वजन सुमारे १ किलो ८०० ग्रॅम असून त्यांची किंमत अंदाजे ३ लाख ६० हजार रुपये आहे. याशिवाय एक सीसीटीव्ही कॅमेराही चोरीला गेला आहे. अशा प्रकारे ३ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे पावसकर यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कोयनानगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के ओलेकर करत आहेत

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close