दोन्ही राष्ट्रवादीचे ठरलय… धनुष्यबाणावर शिक्का :- पालकमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी:-
तांबवे जिल्हा परिषद गटात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना यासह सर्व मित्र पक्षांचे एकत्रित धनुष्यबाणावर शिक्का मारायचं ठरलं आहे. तेव्हा शिवसेनेचे उमेदवार विक्रम पाटील यांना निवडून आणण्यासाठी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच अजित दादांच्या पक्षाकडून तांबवे, सुपने विभागातील तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
तांबवे येथील स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विक्रम पाटील, दिनेश कुंभार, जयश्री पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते एडवोकेट उदयसिंह पाटील- उंडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, कराड बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामचंद्र पाटील, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, साकुर्डी चे उपसरपंच विश्वासराव कणसे, उपसरपंच एडवोकेट विजयसिंह पाटील, कोयना बँकेचे संचालक तुकाराम डुबल, हणमंतराव चव्हाण आदी उपस्थित होते.

विलासकाका सृष्टी उभारणार – पालकमंत्री
सातारा जिल्ह्यातील राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्व हे विलासराव पाटील- उंडाळकर काका होते. विलास काकांनी कराड दक्षिण मतदार संघात कायम विकासाचे काम केले आहे. तांबवे- सुपने या भागावर काकांचे विशेष प्रेम होते. काकांनी नेहमीच या भागाला झुकते माप दिलं. तेव्हा येणाऱ्या एक वर्षाच्या आत कराड दक्षिण मधील कराड- पाटण रोडवर विलास काका सृष्टी उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.



