खून प्रकरण (ग्राऊंड रिपोर्ट1) : राजकीय व्यक्तीचा सहभाग, जुनी भांडणे अन् पवनचक्कीचा संबध

पाटण | तालुक्यातील मोरणा विभागात गुरेघर धरण परिसरात असलेल्या शिद्रुकवाडी- कोरडेवाडी येथे रविवारी (दि. 19) रात्री उशिरा फायरिंग झाले. या गोळीबारात दोनजण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील तर पालकमंत्री व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील या घटनेमुळे आता कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहेच. परंतु याचे पडसाद विधान भवनात अधिवेशनातही पहायला मिळाले. या सर्व घडामोडीत राजकीय व्यक्तीचा सहभाग, जुनी भांडणे अन् पवनचक्की यांचा संबध जोडला जावू लागल्याने हे प्रकरण आता राज्यभर चर्चेत आले आहे.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात दुर्गम भाग असलेल्या डोंगर दऱ्यात सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख व ठाणे जिल्ह्याचे माजी नगरसेवक असलेल्या मदन कदम यांनी हा गोळीबार केला असून पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मदन कदम यांच्यासह पत्नी व दोन मुलांनाही संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. कदम कुटुंबिय हे मल्हारपेठ – कदमवाडी येथील असून फार्म हाऊस शिद्रुकवाडी येथे असल्याने ठाण्याहून आल्यानंतर तेथेच वास्तव्यास असतात.

या गोळीबारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून मदन कदम यांची अोळख आहे. सध्या त्यांचा एकत्रित असलेला व्हिडिअोही सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे जे मयत झाले आहेत, तेही शिंदे गटाचेच व पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे कार्यकर्ते आहेत. सध्या तरी जुनी भांडणे व पवनचक्कीच्या जमिनीच्या वादातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहेत. गोळीबार हा मदन कदम यांच्या फार्महाऊसवर असलेल्या ठिकाणी झाला. यानंतर गावात तणावपूर्व शांतता आहे. पाटण तालुक्यातील या प्रकारामुळे गोळीबार झालेल्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून मिडिया तसेच नागरिकांना जाण्यासाठी मज्जाव केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा प्रश्न सभागृहात लावून धरला असून यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.



