कराड पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवनकुमार गायकवाड यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कृषी विस्तार अधिकारी पुरस्कार

कराड :- जिल्हा परिषद सातारा यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उत्कृष्ट कृषी विस्तार अधिकारी’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कराड पंचायत समितीचे कृषी अधिकारी पवनकुमार गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, शेतकरी हिताची सातत्यपूर्ण तळमळ आणि विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याची दखल घेत त्यांना हा सन्मान मिळाला आहे.
पवनकुमार गायकवाड यांची सन २०१३ मध्ये कृषी विस्तार अधिकारी म्हणून पाटण तालुक्यात नियुक्ती झाली. दुर्गम आणि अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि तळमळीने काम करत कृषी विभागाचा वेगळा ठसा उमटवला. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, शेतकरी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन, पंचायत समिती सेस, जिल्हा परिषद सेस, नवीन राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम, विविध कृषी पुरस्कार, सेंद्रिय शेती तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार अशा अनेक उपक्रमांची त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली.
सन २०२२ मध्ये त्यांची कराड पंचायत समितीत बदली झाली. येथेही त्यांनी कृषी विस्तार अधिकारी म्हणून काम करताना कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार समर्थपणे सांभाळला आहे. शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनामध्ये त्यांनी सादर केलेले ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ या संकल्पनेवरील नाविन्यपूर्ण मॉडेल जिल्हाभरातील नागरिक आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे विशेष लक्ष वेधून घेणारे ठरले. कृषी विषयाचा सखोल अभ्यास, नाविन्यपूर्ण विचार, प्रभावी नियोजन आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते. या पुरस्काराचे श्रेय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना, नोकरीतील सहकारी, मित्रमंडळी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील अधिकारी तसेच वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य यांना दिले आहे. पवनकुमार गायकवाड यांना उत्कृष्ट कृषी विस्तार अधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, कृषी क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी बांधवांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.



