पाटणला 55 वर्षीय व्यक्तीवर रानगव्याचा हल्ला : कराडला जखमीवर उपचार सुरू

पाटण | घराच्या पाठीमागे बक-यांना पाला आणण्यासाठी गेलेल्या दिवशी खुर्द येथील 55 वर्षीय व्यक्तीवर रानगव्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द येथील लक्ष्मण कोंडीबा जाधव यांच्या हाताला जबर मार लागल्याने त्यांच्या वर कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ व वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या बक-यांना पाला आणण्यासाठी घराच्या पाठीमागे गेले होते. त्या दरम्यान गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला जोरात धडक बसल्याने जबर दुखापत होऊन हाड व मास बाहेर आल्याने ते गंभीर जखमी झाले. या नंतर त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने जखमी अवस्थेत पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पाटण वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल पोतदार, वनरक्षक सावरडेकर, संजय जाधव, एन.एस. कदम, सौ. रणेर आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कोंडीबा जाधव हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी पाटण येथून कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.