काॅंग्रेस- शिवसेना (उबाठा) गटात मतभेदाचे कारण शंभूराज देसाईंनी सांगितले म्हणाले…
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटक पक्ष काॅंग्रेस आणि उबाठा गटात मतभेद झालेले आहेत. लोकसभेच्या 8-9 जागांवर दोघांनीही दावा सांगितला आहे, तर हे होणारच होते. कारण त्यांची नैसर्गिक अंलायन्स (युती) नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि अटबिहारी वाजपेयी यांनी शिवसेना- भारतीय जनता पक्ष विचाराने एकत्रित आणले होते. त्यांची नैसर्गिक युती झाली होती. उबाठा गट- काॅंग्रेस पक्षाची आणि त्याच्या कार्यकर्त्याची विचारसरणी भिन्न आहे. केवळ गेल्या साडेतीन वर्षापूर्वी सत्तेसाठी महाविकास आघाडी झाली आणि एकत्रित आली. आता केवळ लोकसभेला 8-9 जागांवर मतभेद झाले आता पुढे विधानसभेला प्रत्येक जागेवर मतभेद होणार आहेत. त्याच्यामध्ये वादविवाद होणार आहेत, याचे एकमेव कारण म्हणजे त्याची विचारसरणीच भिन्न असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
सातारा येथे मंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, महाविकास आघाडीत काय व्हायचे ते होवू द्या. पण महाराष्ट्रातील जनतेचे एकमत झालं आहे आणि पुन्हा एकदा देशात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच पाहिजेत. तेव्हा महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात आम्ही 45 पेक्षा अधिक लोकसभेला खासदार महाराष्ट्रातून पाठवू.
उबाठा आणि काॅंग्रेस मधील वाद कोणत्या जागेवरून
महाविका आघाडीतील उबाठा (शिवसेना) आणि काॅंग्रेस यांच्यामध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना, शिर्डी, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम या जागांवरून वाद असल्याचे सांगितले जात आहे. यामधील 5 जागांवर शिंदेच्या गटातील खासदाराचा समावेश आहे तर 3 जागेवर भाजपाचे खासदार आहेत.