नियम मोडला भर दंड : कराड वाहतूक शाखेकडून एका महिन्यात 20 लाख 57 हजारांचा दंड

कराड | कराड शहर वाहतूक शाखेने एका महिन्यात वाहतूकीचे नियमांचा भंग केल्या प्रकरणी 3 हजार 315 केसेस करून तब्बल 20 लाख 57 हजार 200 रुपये दंड केला आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असे सहायक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी सांगितले आहे.
कराड शहर पोलिसांच्या हद्दीत वाहतुकीस अडथळा तसेच दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने रोडवर धोकादायक रीतीने वाहने उभे करणाऱ्या वाहन चालकांवरती आयपीसी कलम 283 प्रमाणे 56 गुन्हे दाखल करून पुढील कारवाईसाठी कोर्टात पाठवण्यात आले. तसेच दारू पिऊन वाहन चालक वर 185 प्रमाणे 5 गुन्हे दाखल केले आहेत. ऑगस्ट महिन्यात वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहरच्या वतीने शहरात कॉलेज परिसर विद्यानगर, भाजी मंडई व प्रीतीसंगम घाट या ठिकाणी विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मोटार वाहन अॅक्टप्रमाणे ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलणे, सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने जाणे, सीट बेल्ट नसणे, नो पार्किंगमध्ये वाहने लावणे, सालेन्सरमध्ये बदल करणे अशा 3 हजार 315 केसेस करण्यात आल्या. सदर कामगिरीत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकूर याचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व कर्तव्यावर असणारे सर्व अंमलदार यांनी भाग घेतलेला आहे.
एका दिवसात पोलिस उपनिरीक्षकाने केल्या 51 केसेस
ऑगस्ट महिन्यात पोलीस हवालदार शरद चव्हाण यांनी 253 केसेस करून 1 लाख 61 हजार 100 रुपये दंड केला आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय खाडे यांनी दिनांक 29 ऑगस्ट रोजी एका दिवसात 51 केसेस करून 60 हजार रुपये दंड वसूल केला आहे. पोलीस हवालदार मनोज शिंदे यांनी 163 केसेस करून 1 लाख 87 हजार 500 रुपये सर्वात जास्त दंड वसूल केला आहे. या तिघांना त्याच्या कामगिरीबद्दल कराडचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी अंमलदारांना पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले.