कराड किराणा भुसार असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात : व्यापार व उद्योग पुरस्काराने सन्मान

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
कराड किराणा भुसार असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यावसायिकांना व्यापार व उद्योग पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. खेळीमेळीच्या वातावरणात कराड किराणा भुसार असोसिएशनची वार्षिक सभा मसूरला गौतम ऍग्रो या ठिकाणी संपन्न झाली. यावर्षीपासून ज्येष्ठ व्यावसायिकांना व्यापार व उद्योग पुरस्कार देण्यात आला. नवीन पिढीला कौतुकाची थाप टाकून व त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कार देण्यात आल्याची माहिती कराड किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शाह यांनी दिली. कराड शहरातील किराणा भुसार व्यवसायिक उपस्थित होते.
कराडचे जेष्ठ व्यवसायिक कल्याणजीभाई पटेल, मसूरचे जेष्ठ उद्योजक रणजितभाई उर्फ बच्चूभाई शाह, अनिल सचदेव, संदीप घारे, प्रीतम शाह, दिनेश अग्रवाल, पोपट घारे यांना पुरस्कार देण्यात आले. कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजीराव चव्हाण, व्यापारी प्रतिनिधी मनुभाई पटेल, जगन्नाथ लावंड, संस्थेचे संचालक राजेंद्र शाह, चिमनभाई पटेल, राजू शाह, अमोल शाह, भद्रेश शाह, तौसिफ भाई व संचालक मंडळ उपस्थित होते.
सभापती विजयकुमार कदम म्हणाले, बाजार समिती अंतर्गत व्यापाऱ्यांनी प्रामाणिक व एकोप्याने राहावे, व्यवसायात वाढ करावी. मसूरला बाजार समितीच्या आवारात व्यावसायिकांसाठी गाळे उभारण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत आहे. जेष्ठ उद्योजक रणजितभाई शाह यांनी आपले व्यावसायिक अनुभव व भविष्यातील व्यापार यावर मार्गदर्शन केले. अध्यक्ष राजेंद्र शाह यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव मदन कोकीळ यांनी अहवाल वाचन केले. करीमभाई खोजा यांनी संस्थेचा आर्थिक हिशेब व ताळेबंद मांडला. उपाध्यक्ष स्वप्नील शहा यांनी आभार मानले.