मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडं जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली


सातारा । महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा- वाघेरा रस्त्यावर दरड कोसळली असून महाबळेश्वर कडुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडं जाणारा रस्ता बंद झाला होता. काही वेळातच ग्रामस्थांनी दरड हटवली आहे. त्यामुळे रस्त्यावरून वाहनांना ये- जा करण्यास वाहतूक सुरू झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गेल्या चार दिवसापासून महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या 24 तासात 300 मिलीमीटर पाऊस पडला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर डोंगरचा काही भाग खचल्याने माती, दगड रस्त्यावर आली होती.
सदरील तापोळा- वाघेरा रस्त्यावर काही काळ वाहतुक ठप्प झाली होती. परंतु तेथील ग्रामस्थांनी दरड हटवली आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. तर अजूनही रस्त्यावर माती, छोटे- छोटे दगड असल्याने व पाऊस सुरू असल्याने वाहन चालकांची कसरत होत आहे. महाबळेश्वर परिसरात अजूनही पावसाचा जोर चांगलाच आहे.



