जागतिक पर्यावरण दिनास घोलपवाडी, शामगावात वृक्षारोपण
भाजप किसान मोर्चा अध्यक्ष रामकृष्ण वेताळांचे मार्गदर्शन

कराड : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य देत भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी घोलपवाडी व शामगाव येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरणाचे महत्त्व केवळ भाषणांमधून न सांगता प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देण्याचा आदर्श त्यांनी यावेळी घालून दिला. पाच जून हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. वाढते तापमान, पावसाची अनियमितता, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणीय असमतोल यांसारख्या गंभीर समस्यांवर वृक्षारोपण हा प्रभावी उपाय असल्याचे रामकृष्ण वेताळ यांनी यावेळी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात रघुनाथ शेंडगे, अमित पाटील, शशिकांत घोलप, गोरख पवार, पांडुरंग घोलप, संपत जाधव, रमेश जाधव, उपसरपंच बाळासाहेब पोळ, ग्रामपंचायत सदस्य राहुल यादव संतोष कणसे, कृष्णत पोळ, बाबुराव पोळ (चेअरमन), विजय पोळ, सचिन डांगे, अमोल डांगे, संभाजी पोळ, उद्धव पोळ, तेजस पोळ यांच्यासह घोलपवाडी व शामगाव परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले. रासायनिक शेतीमुळे पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता सेंद्रिय शेतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वृक्ष लागवड व सेंद्रिय शेतीसाठी प्रयत्नशील
वाढत्या तापमानवाढीतून सुटका मिळवण्यासाठी तसेच आरोग्यदायी जीवनशैली निर्माण करण्यासाठी वृक्ष लागवड आणि सेंद्रिय शेती हाच प्रभावी पर्याय आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलून या दोन्ही उपक्रमांचा व्यापक प्रसार करण्यासाठी वर्षभर कार्यरत राहणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच लोकांचे आरोग्य सुधारावे हेच आमचे ध्येय आहे.
— रामकृष्ण वेताळ
प्रदेशाध्यक्ष, भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र



