रयतच्या समन्वय समिती सदस्यपदी अतुल कदम यांची निवड
रयत शिक्षण संस्था, सातारा मध्य विभाग समन्वय सदस्यपदी निवड

कराड:- दानशूर बंडो गोपाळ कदम यांचे नातू व जनरल बॉडी सदस्य सुभाष कदम यांचे चिरंजीव अतुल कदम यांची आशिया खंडातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्था, सातारा मध्य विभाग समन्वय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अतुल कदम यांनी या आधी कराड मधील एस. जी. एम महाविद्यालयातील विकास समितीवर दहा वर्ष व शहरातील नामांकित यशवंत हायस्कूल आणि केशवराव पवार स्कूल कमिटीवर काम पाहिले आहे.
अतुल कदम यांनी केलेले सामाजिक, सार्वजनिक व लोकोपयोगी कार्य, विद्यार्थ्यांना व पालकांना केलेली मदत तसेच समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या सर्वसमावेशक कार्याची दखल घेऊन संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल मीटिंगमध्ये एक मताने ठराव करण्यात आला.
या निवडीने सामाजिक काम करण्यास आणखी नवे बळ मिळणार असून शैक्षणिक क्षेत्रातील अमुलाग्र बदल लक्षात घेवून पुढील वाटचाल करणार असल्याची भावना नवनिर्वाचित सदस्य अतुल कदम यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड रविंद्र पवार, प्रा. डॉ. मोहनराव राजमाने, प्रा. डॉ. चंद्रकांत खिलारे, जनरल बॉडी सदस्य शिवाजीराव कदम, किसनराव पाटील- घोणशीकर, ॲड. सदानंद चिंगळे, ॲड. सत्यजित पवार या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख आणि संघटक डॉ. अनिल पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या.



