‘सुंदर माझी शाळा’ अभियान : सातारा जिल्ह्यात कराडचे यशवंत हायस्कूल पहिले

सातारा- रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत हायस्कूल, कराड या शाळेने ‘सुंदर माझी शाळा अभियान २०२५-२६’ मध्ये उत्तुंग भरारी घेत सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावला आहे. संत सोपानकाका सहकारी बँक लि., सासवड आणि संत सोपानकाका फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या पाच जिल्ह्यामधून तब्बल ४०६२ शाळांच्या सर्वेक्षणातून यशवंत हायस्कूलची सातारा जिल्ह्यामधून प्रथम क्रमांकाची निवड करण्यात आली आहे.
सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी आमदार संजय जगताप, आमदार निरंजन डावखरे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ॲड.रविंद्र केशवराव पवार (भाऊ),मुख्याध्यापक व्ही. यु. पाटील, पर्यवेक्षिका एस. एस. मोरे, माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शाळेच्या सर्वांगीण प्रगतीची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली असून, कराड तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. यावेळी मुख्याध्यापक व्ही. यु. पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एम. महामुलकर, एस. डी. शेडगे, एस. एम. घारगे, झहीर शेख, व्ही. टी. येसनकर, अमोल यादव हे उपस्थित होते.



