
कोयनानगर – कोयना धरण परिसरात पावसाने धुवाधार हजेरी लावली असून जिल्ह्यात सर्वदूर पोहचला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीला वेग आला आहे. उद्या सातारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट असल्याने प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या चोवीस तासात कोयना धरणात 25 हजार क्युसेस प्रतिसेंकद पाण्याची आवक धरणात सुरू झाली आहे. कोयना धरणात सध्या 18.19 टीएमसी पाण्याचा साठा आहे. मोरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६२.०१ टक्के पाणीसाठा साठलेला आहे.
गेल्या 24 तासात कोयना धरणात 189, नवजाला 210 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 233 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज आॅरेज अलर्ट दिला आहे. तर उद्या रविवारी रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे.
पाटण तालुक्यातील मोरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सातत्यपूर्ण पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मोरणा गुरेघर धरणाची पाणी साठवण क्षमता 1.04 टीएमसी इतकी असून सध्या धरणात 0.84 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणीपातळी ६५५.४५ मीटर इतकी झाली असून ती सांडवा पातळीपर्यंत पोहोचली आहे. सध्या धरणात ६२.०१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सध्या धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले नसले, तरी सांडव्यावरून ३० क्युसेक्स इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तसेच सिंचन व विद्युत विमोचकातून १२० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असून, नदीपात्रात एकूण १५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास सांडव्यावरील विसर्गात वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे मोरणा नदीकाठावरील सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठावरील हालचाली टाळाव्यात, असे आवाहन संबंधित प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



