संगीता साळुंखे यांना राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान मराठा नवदुर्गा’ पुरस्कार
महिला सक्षमीकरण, ग्रामविकास व शैक्षणिक कार्याची दखल; पुण्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

मसूर (हॅलो न्यूज) : – महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य, ग्रामविकास आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत समाजहितासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.संगीता तानाजीराव साळुंखे यांना अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (ट्रस्ट) यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘कर्तृत्ववान मराठा नवदुर्गा – समाजसेविका पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. रविवारी (१ नोव्हेंबर) पुणे येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, औंध येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महिलांना सक्षम बनविणे, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू घटकांना मदतीचा हात देणे, शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणे आणि ग्रामविकासाच्या कामात सक्रिय सहभाग घेणे, अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यावेळी शरद साळुंखे, शेखर साळुंखे, संदेश ताकवले, ज्ञानेश्वर देशमुख यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनने दिलेल्या या सन्मानाबद्दल मी मनापासून आभारी आहे. पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाज नेहमीच सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची प्रेरणा देतो. याच भावनेतून या पुरस्काराचा सन्मान राखत यापुढेही समाजहिताचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवणार आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी दसपटीने वाढली असून, भविष्यातील कार्य समाजाला अभिमान वाटेल असेच राहील.
– संगीता साळुंखे,अध्यक्षा माई चॅरिटेबल ट्रस्ट.



